पुणे : शहर भारतीय जनता पक्षावर आपलीच मजबूत पकड असावी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट व खासदार संजय काकडे यांच्यात निर्माण झालेली गटबाजी आता चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. खा. काकडे यांनी शनिवारी आपल्या समर्थक नगरसेवकांची आपल्याच कार्यालयात बैठक घेतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून ना. बापट यांनीही रविवारी आपल्या समर्थक नगरसेवकांची पालिकेतील भाजप कार्यालयात बैठक घेतली. खा. काकडे यांच्या बैठकीला 65 नगरसेवकांची उपस्थिती होती, असे सांगण्यात आले. तर ना. बापटांच्या बैठकीला 50 नगरसेवकांची उपस्थिती होती, असे सांगण्यात आले. तथापि, या बैठकीला भाजपचे नेते, पदाधिकारी व नगरसेवक किती उपस्थित होते? याबाबतची अधिकृत आकडेवारी दोघांकडूनही सांगण्यात आली नाही. शहरातील विकासकामे अत्यंत संथगतीने सुरु असून, त्याला पालकमंत्री बापट व महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे जबाबदार आहेत. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत पक्षाला त्याचा जबरदस्त फटका बसेल, अशी तक्रार काकडे गटाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. तर शहरातील विकासकामे वेगात सुरु असून, महापालिकेत सर्वकाही सुरुळीत सुरु आहे. शहरासह जिल्ह्यात भाजपला अच्छे दिन आलेले आहेत, अशी माहिती बापट गटाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आलेली आहे. मध्यंतरी काकडे-बापट गटांतील शीतयुद्ध थांबल्याची चर्चा होती. परंतु, दोन दिवसांतील या ‘जोर’बैठका पाहाता शहर भाजपात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे.
खा. काकडेसमर्थकांच्या बैठकीत महापालिकेच्या कारभारावर टीका
सद्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलेल्या भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेतील भाजपच्याच दोन गटात निर्माण झालेल्या दुफळीकडे दुर्लक्ष केले असले तरी, ही दुफळी सद्या शहरात चर्चेचा विषय झालेली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुका पाहाता, शहरातील संथगतीने होणारी विकासकामे अडचणीची ठरू शकतात. रखडलेल्या विकासकामांबद्दल लोकांना काय उत्तर द्यायचे? असा सवाल खा. काकडे समर्थकांनी केला आहे. विकासकामे रखडण्यास महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व पालकमंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत, असा आरोपही हे काकडेसमर्थक नगरसेवक करत आहेत. समर्थकांच्या तीव्र भावना पाहाता, राज्यसभेचे खासदार असलेल्या संजय काकडे यांनी शनिवारी आपल्या कार्यालयात नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अंदाजे 65 नगरसेवकांची उपस्थिती होती, अशी माहिती देण्यात आली. तसेच, शहर भाजपचे काही पदाधिकारी व वरिष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांसह पालकमंत्र्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महापौरांविरोधातही नाराजीचा सूर होता. तसेच, रखडलेल्या विकासकामांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सत्तेत आपण समान सहभागी असताना आयुक्त भेटण्यासाठी तासंतास ताटकळवतात, निधी देतानाही पक्षपात करण्यात येतो, आदी स्वरुपाच्या तक्रारीही यावेळी खा. काकडे यांच्याकडे करण्यात आल्या. त्यामुळे यापुढील काळात आपण शहरातील विकासकामे व महापालिकेच्या कारभारावर लक्ष केंद्रीत करू, अशी ग्वाही खा. काकडे यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली. शहरात सद्या असा एकही प्रकल्प सुरु नाही की तो आपण लोकांना सांगू शकतो हा प्रकल्प सद्या सुरु आहे. महापालिकेतील पदाधिकारी व नोकरशहा यांची अभद्र युती झाली असून, ते शहराच्या विकासकामाला खीळ घालत आहे, अशी टीकाही यावेळी झाली. जे काही चालू आहे, तो सर्व प्रकार आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्यांनीच शहरात लक्ष घालावे, अशी विनंती करू, अशी ग्वाहीही यावेळी खा. काकडे यांनी समर्थकांना दिली.
ना. बाटप म्हणतात शहरात सर्वकाही सुरुळीत!
शनिवारी खा. काकडे यांनी समर्थक नगरसेवकांची बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनीही सोमवारी आपल्या समर्थकांची बैठक घेण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला 50च्या आसपास नगरसेवक व पदाधिकारी, तसेच शहर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, असेही सांगण्यात आले. खा. काकडे यांनी शहर भाजपसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या विकासकामांची स्थिती जाणून घेतली. शहर भाजपात सर्वकाही सुरुळीत सुरु असून, विकासकामेही प्रगतीपथावर असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. तसेच, काही विकासकामे लवकरच हाती घेण्यात येणार असून, या प्रकल्पांबाबत वाद आहेत, त्याबाबत विचारविनिमय करून तोडगा काढला जाईल, असेही ना. बापट यांनी बैठकीत स्पष्ट केले. यापूर्वीही समान पाणीपुरवठा योजनेची निविदा रद्द करण्यासाठी खा. काकडे समर्थकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. साखळी करून तीनच ठेकेदारांनी या योजनेची कामे वाटून घेतली अशी तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही निविदा रद्द केली होती. आता याच योजनेच्या फेरनिविदेवरही काकडेसमर्थकांनी आक्षेप घेतलेला आहे. खुद्द खा. काकडे यांनीच महापालिका आयुक्तांना पत्र देऊन योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप नोंदविलेला आहे. त्यानंतर शनिवारच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सविस्तर माहिती घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे खा. काकडे व ना. बापट यांच्यातील राजकीय शीतयुद्ध पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेले आहे.