देहूरोड : देहूरोड येथील रेल्वे पुलाजवळ मंगळवारी सायंकाळी सातवाजल्याच्या सुमारास वाहतूक कोंडी झाल्याने जवळपास 4 किलो मीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा सामना पालकमंत्री गिरीश बापट यांनाही करावा लागला. परिणामी वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांनी पोलिसांना चांगलेच खडेबोल सुनावले. त्यानंतर तातडीने कार्यवाही करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, हे झाले एका दिवसाचे पण या मार्गावर रोजच ज्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो त्या सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
थेट पालकमंत्री पोलिस ठाण्यात
देहूरोड येथील रेल्वे पुलाजवळ दोन्ही बाजूला रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने सायंकाळी सातच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. याच वेळी पालकमंत्री गिरीश बापट हे पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रम आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी होऊनही येथे कोणीही वाहतूक पोलिस नसल्याने त्यांनी देहूरोड पोलिस स्टेशनला येऊन याबाबत पोलिसांना चांगलेच धारेवर धरत खडेबोल सुनावले. पालकमंत्र्यांनी सुनावल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने काम सुरू केले. त्यानंतर जवळपास दोन तासांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
केवळ वसूलीच करू नये
शहर वाहतूक नियंत्रण शाखा वाहनधारकांकडून केवळ दंडच वसूल करते, वाहतुकीच्या समस्येशी त्यांना काहीच देणेघेणे नसते अशी ओरड नित्याचीच आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारी दस्तरखुद पालकमंत्र्यांना आला. मार्च एन्डमुळे हा विभाग कारवाई आणि वसुलीच्या मागे हाथ धुऊन लागला आहे. एरवीसुद्धा खिसे भरण्याकडेच या विभागाचा कल असतो अशी ओरड कायमचीच असते. गोरगरीब वाहतुकदारांना दंडीत करण्यापेक्षा वाहतुकीचे नियम त्यांच्या पचनी पडावेत म्हणून व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. या मार्गावर विस्तारिकरणाचे कामकाज सुरू असून वाहतुकदारांसोबतच रहिवाशींनाही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यासाठी चर खोदण्यात आलेले असल्याने दुकान, मेडिकल, एटीएम अशा अनेक सेवासुविधा घेताना देहूरोडकरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे छोटे-मोठे अपघातही होत आहेत.
प्रादेशिक परिवहन विभाग नामानिराळच
प्रादेशिक परिवहन विभागाचे सुद्धा रस्ते वाहतूक प्रश्नी अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. केवळ रस्ता सुरक्षा सप्ताहापुरता हा विभाग लोकांसमोर येत असतो. या मार्गावर अपघातांची मालिका वाढली आहे. अपघात झाल्यानंतर अनेक जण बघ्याची भूमिका घेत असतात. तर काही मदत राहीलीच लांब अपघाताचे चित्रीकरण व फोटोसेशन करण्यात धन्यता मानत असतात. पोलिसांचा आपल्यामागे ससेमिरा लागेल म्हणून अनेकजण इच्छा असतानाही अपघातग्रस्तांना मदत करण्यास धजावत नाहीत. वेळीच मदत मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावे लागतात. तर काहींना कायमचे अपंगत्व प्राप्त होते. अशा अपघातांमध्ये अनेकवेळा घरातील कर्ते पुरूष दगावत असतात. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळावी म्हणून मतदकार्य करणार्यांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम आणि जनजागृती अभियान राबविणे आवश्यक आहे.