जळगाव । राज्य शासनाने 28 जून रोजी शासन निर्णयानुसार शेतकर्यांच्या कर्जमाफीचा अध्यादेश काढण्यात आला होता. यानुसार राज्यातील शेतकर्यांचे फक्त दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या नादात जाहीर केलेली कर्जमाफी ही पुर्णपणे शेतकर्यांची फसवणूक करत आहे, शासन शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या संदर्भात उदासीन दिसून येत असल्याच्या निषेधार्थ व्यक्त करत येत्या स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण पालकमंत्री यांनी न करता एखाद्या स्वातंत्र्यसैनिक यांच्याहस्ते व्हावे, अशी विनंती सुकाणू समिती पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार असल्याची माहिती नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात येथे झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती दिली.
अजिंठा चौफुलीवर आंदोलन
सरकारने राज्यातील शेतकर्यांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय तीन वेळा घेतला. परंतु अद्यापही शेतकर्यांना या कर्जमाफीचा नाहीच नाही तर प्रत्येक शेतकर्याला प्रोत्साहन म्हणून जाहीर केलेले 10 हजार रूपये सुद्धा शेतकर्यांच्या खात्यात मिळाले नाही. करोडो जनता व मीडियांच्या समोर शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन देवून वारंवार बदलले जाणारे निर्णय, जाचक अटी व निकष यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रवास्था व साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीची योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे येत्या 14 ऑगस्ट रोजी शहरातील अजिंठा चौफुलीवर दुपारी 2 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
दोघा मंत्र्यांनी खुपसला खंजीर
कर्जमाफी निकष ठरविण्याच्या चर्चेसाठी मंत्रीगटाचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इतर मंत्र्यांसह जिल्ह्यातील जलसंपदामंंत्री ना. गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांनी सुकाणू समितीच्या बाजूने न लढता शासनाचा पैसा कसा वाचेल, याकडे अधिक भर दिला. दोघी मंत्र्यांनी शेतकर्यांचा विश्वासघात करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. कर्जमाफीचे निकष पालकमंत्र्यांनी पाळले नाही, शेतकर्यांना हमी भाव नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले म्हणजे शेतकर्यांचा अपमान केल्यासारखे असल्याने त्यांच्याऐवजी एखाद्या स्वातंत्र्य सैनिक यांच्याहस्ते व्हावी अशी मागणी खूद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून विनंती सुकाणू समीती करणार आहे.
यांची होती उपस्थिती
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे, भारतीय लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे, सुकाणू समिती संघटक एस.बी पाटील, भारत कृषक समाज सदस्य जगतराव पाटील, जेडीसीसी संचालक संजय पवार, सचिन धांडे, मेहमूद बागवान, राष्ट्रवादीचे विनोद देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे मुकूंद सपकाळे, विकास नरवाडे, अॅड. विजय पाटील, दिलीप पाटील, रणजित निकम, संजय चौधरी, रणजित निकम, विकास पवार, मिलींद पाटील, खुशाल चव्हाण, ऋषीकेश चव्हाण, नाना चव्हाण, किरण पाटील, विवेक रणदिवे आदी पदाधिकारी व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.