जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नियोजन भवनात सुरू झालेल्या आढावा बैठकीस जिल्ह्यातील आमदारांना प्रवेश नाकारण्यात आला. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर आमदारांना बैठकीला प्रवेश देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढाव्यासंदर्भात नियोजन भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सकाळीच जिल्ह्यातील आमदार नियोजन भवनाजवळ दाखल झाले होते. मात्र सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी आमदार व इतर लोकप्रतिनिधींना प्रवेश नाकारला. या बैठकीस केवळ विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातील जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे सादरीकरण केले.