प्रत्येक कार्यक्रमाला उशीर ठरलेलाच
पिंपरी : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा कार्यक्रम म्हणजे दोन तास उशीर हे समीकरणच झाले आहे. पालकमंत्री कोणत्याही कार्यक्रमाला नियोजित वेळेला हजर राहत नसल्याचे दिसून आले आहे. नियोजित वेळेपेक्षा एक ते दोन तास विलंबाने ते कार्यक्रमस्थळी येतात. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. पालकमंत्री असल्यामुळे पदाधिकारी काही बोलत नाहीत. परंतु, कार्यकर्ते मात्र नाराजी व्यक्त करत आहेत.
राष्ट्रवादीची टीका
महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते अनेक कार्यक्रमांना गैरहजर राहत होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली होती. पालकमंत्र्यांना पिंपरी-चिंचवडची अॅलर्जी आहे का, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर पालकमंत्री शहरातील कार्यक्रमाला येऊ लागले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या शहरात येत नसल्याचा आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर देखील दिले होते.
प्रभाग 21 मध्ये सव्वा तास उशीर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक 21, पिंपरी मधील शहीद हेमू कलानी अर्धपुतळ्याच्या चौथर्याचे भुमिपूजन व उद्यान सुशोभिकरण कामाचा शुभारंभाचे गुरुवारी (दि.17) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची नियोजित वेळ सकाळी 11 ची होती. त्यामुळे पदाधिकरी, कार्यकर्ते वेळेत उपस्थित झाले होते. परंतु, पालकमंत्री सव्वा तासाच्या विलंबाने म्हणजे सव्वाबाराला कार्यक्रमस्थळी आले. तोपर्यंत प्रभागातील राष्ट्रवादीचे तीनही नगरसेवक निघून गेले होते.
पिंपरीमध्ये अडीस तास उशीर
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या एम्पायर इस्टेट पुलाचे लोकार्पण सोमवारी (दि.14) पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. पुलाच्या लोकार्पणच्या कार्यक्रमाची नियोजित वेळ सायंकाळी साडेपाचची होती. या कार्यक्रमाला देखील पालकमंत्री तब्बल अडीच तास विलंबाने आले. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ते कार्यक्रमस्थळी आले होते.
फेस्टिव्हलसाठी 4 तास उशीर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने गणेशोत्सावानिमित्त सुरु करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला देखील पालकमंत्री चार तासाने उशिरा आले होते. त्यावेळी मेट्रो लवकर सुरु करा म्हणजे मी वेळेत येईल, असे सांगत त्यांनी उशिरा येण्याचे समर्थन केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्र्यांच्या कार्यक्रम म्हणजे दोन तास उशीर होणार हे ठरलेलेच आहे. पालकमंत्री उशिरा येत असल्यामुळे कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागते. पदाधिकार्यांना देखील ‘वेटिंग’ करावे लागत आहे. परंतु, पालकंमत्री असल्यामुळे पदाधिकारी काही बोलत नाहीत. परंतु, कार्यकर्ते मात्र नाराजी व्यक्त करत आहेत