पाडळे शिवारात केळी नुकसानीच्या पाहणीप्रसंगी राष्ट्रवादी पदाधिकार्यांशी तु-तु मैं मै ; सोपान पाटील यांना बाहेर काढल्यानंतर वादावर पडदा
रावेर (प्रतिनिधी)- रावेर तालुक्यात वादळी वार्यामुळे केळी बागांचे नुकसान झाल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. तालुक्यातील पाडळे शिवारात मंत्री महाजन एका शेतकर्यांच्या शेताची पाहणी करत असताना राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री व मदत पुनर्वसन मंत्री का आले नाहीत? असा जाब विचारताच मंत्री महाजन चांगलेच भडकले. मुख्यमंत्री महोदयांनीच मला पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मंत्री महाजन व पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याने उपस्थितही अवाक झाले. भाजप पदाधिकार्यांनी पाटील यांना शेतातून बाहेर काढून समजूत घालून वादावर पडदा टाकला मात्र या प्रकाराने तालुक्याच्या राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली.
विमा नसणार्या शेतकर्यांनाही भरपाई देणार -मंत्री महाजन
केळीच्या नुकसान भरपाई संदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधित विमा कंपन्यांना पंचनामे पूर्ण झाल्यावर तत्काळ भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शेतकर्यांनी विमा काढलेला नसेल त्यांना देखील शासन नुकसान भरपाई देणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी दरम्यान आश्वासन दिले. मंत्री महाजन यांनी गुरुवारी केर्हाळा अहिरवाडी, निरुळ, पाडळे, खानापूर, अजनाड परीसरातील नुकसानग्रस्त केळीची पाहणी करून शेतकर्यांचे सांत्वन केले. शिवाय शासन शेतकर्यांच्या पूर्ण पाठीशी असून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत देण्याचे सांगितले.
आमदार जावळे व अनिल चौधरींमध्ये तु तु मैं मैं
मंत्री महाजन अहिरवाडीतील शेतकर्यांशी संवाद साधत असताना एका शेतकर्याने आमदार हरीभाऊ आमच्या गावासह रस्त्यांकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणताच आमदार जावळेंनी अनिल चौधरींचे कार्यकर्ते माझ्या बद्दल गैरसमज पसरवत असल्याचे सांगितले. असे म्हणताच शेजारीच असलेले अनिल चौधरी यांनी तुमचा मतदारसंघ आहे, समस्या सोडविण्याची जबाबदारी तुमची आहे, असे सांगून त्यांनी या विषयावर पडदा टाकला मात्र भाजपाच्या पदाधिकार्यांमध्ये गुरुवारी झालेल्या तु तु मैं मैं मुळे रावेर तालुक्याच्या राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली.
यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, आमदार हरीभाऊ जावळे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी आमदार अरुण पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश पाटील, प्रल्हाद पाटील (मोरगावकर), सरपंच राहुल पाटील, माजी सरपंच विशाल पाटील, सरपंच श्रीकांत महाजन, तहसीलदार विजयकुमार ढगे, कृषी अधिकारी सुधाकर पवार उपस्थित होते.