पालकमंत्र्याच्या संपर्क कार्यालयालगतच्या टपरीत बॉम्ब?

0

निनावी फोनवरुन उडाली खळबळ ; बॉम्बशोधक पथकासह पोलिसांकडून चौकशी

जळगाव- जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयालगतच्या भिंंतीजवळ बॉम्ब असल्याच्या अफवेने रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मात्र याठिकाणी कुठलीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. अखेर निनावी फोनवरील अफवाच ठरली.

शहरातील जी.एस, मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय आहे. या संपर्कजवळ राम होंडा हे दुचाकीचे शोरुम असून शोरुम व संपर्क कार्यालयादरम्यान एक बोळ आहे. या गल्लीला लव्हगल्ली म्हणून संबोधले जाते. या गल्लीत बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन पोलिसांना आला. या फोनवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप आराक यांच्यासह कर्मचार्‍यांनी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले. याठिकाणी संपर्क कार्यालयालगत एक व्यक्ती पान टपरी लावतो. त्याच्या टपरीचीही तपासणी करण्यात आली. मात्र त्याच्या टपरीत कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मिळून आली नाही. दरम्यान या अफवेने कार्यकर्त्यांसह नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

निनावी फोन करण्याची होणार चौकशी?
याठिकाणी कुठलीही आक्षेपार्ह वस्तू अथवा बॉम्ब अशी कुठलीही वस्तू नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप आराक यांनी दिली. अफवा पसरवू नये तसेच त्याच्यावर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. निनावी फोन नेमका कुणाचा आला, त्याचा नंबर त्यावरुन त्याची चौकशी करण्यात येईल. व पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप आराक यांनी बोलतांना सांगितले.