पालकांना रोजगार नसल्याने बालकांना करावे लागते मका विकण्याचे काम

0

शहादा। नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीला दीड तपापेक्षा अधिक कालावधी लोटला. यात राज्यात दरडोई उत्पन्न व मानव निर्देशांक यात अगदी शेवटच्या क्रमांकावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात रोजगाराची परिस्थिती किती विदारक आहे. याचे स्पष्ट चित्र एका स्वयंसेवी संस्थेने उभारलेली माणुसकीची भिंत तर दुसरीकडे केवळ कुटुंबातील सदस्यांची व आपला उदरनिर्वाह व्हावा, आपल्या पोटाची खळगी भरावी यासाठी हातगाडी वर मक्याची कणसे ( भुट्टा) विकतांना तीन वर्षीय बालक.यावरून स्पष्ट होते. नंदुरबार जिल्हा निर्मितीला दीड तपापेक्षा अधिक कालावधी लोटला मात्र ह्या जिल्ह्यातील लोकांना आजही रोजगाराच्या शोधात परप्रांतात गुजरात, मध्यप्रदेश येथे जावे लागते. कारण, ह्या जिल्ह्यात अद्यापपर्यंत एम.आय.डी.सी. ही फक्त कागदा वरच विकसित झाली आहे. जिल्ह्यात औद्योेगिक क्षेत्र विकसित झाले नाही. यामुळे जिल्ह्यात रोजगाराचा गंभीर प्रश्न उपस्थित होत राहतो.

शासनातर्फे कोट्यावधी रूपये खर्च
ह्या अश्या अनेक परिवारातील बालकांचे शिक्षणाचे वय कामात जात आहे. त्यामुळे आत्ता जिल्ह्यासमोर खरा शिक्षणाचा आकडा ही तपासणे गरजेचे ठरणार आहे. सध्या केंद्रशासनाने व राज्यशासनाने ह्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासावर कोट्यावधी रुपये खर्च करीत असले तरी फलित किती हे ह्या सदृश्य परिस्थिती वरुन निश्चितच लक्षात येईल. आधीच ह्या नंदुरबार जिल्ह्याच्या मानगुटीवर कुपोषण, सिकलसेल, बालमृत्यूव, स्थलांतर ही भुते बसलेली असतांनाच ह्या बालकाची पोटासाठीची धडपड सार्‍यांनाच चिंता करायला लावणारी आहे.

कायम रोजगार नाही
जिल्ह्यात शहादा तालुक्यातील श्री. सातपुडा साखर कारखाना व लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणी , डीसलरी प्ल्यान्ट आदी प्रकल्प कै.पी.के.आण्णा पाटील यांनी परिसरातील शेतकरी व बेरोजगारांना रोजगार मिळावा ह्या हेतूने सुरू केले आहेत. मात्र जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी इतर कंपन्या कायम रोजगाराच्या दृष्टीने शासनाने पुढाकार घेऊन केलेल्या नाहीत . ह्या सार्‍या समस्यांना मुळे अनेक घरात आजही एकावेळीसच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न गंभीर आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
यालाच विकास म्हणावा का..? जिल्ह्यात बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात आहे. हे त्याचे बोलके छायाचित्र..! यास काय म्हणावे, खरोखरच गेल्या दीड पेक्षा जास्त दशकातील हे आशादायक चित्र आहे का..? या बाबत जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकीय नेतृत्व व मातब्बर राजकारणी हे चित्र बदलण्यासाठी खरोखरच गंभीर्याने विचार करणार आहेत का..? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.