पालकांनी आपली स्वप्ने मुलांवर लादू नये

0

चोपडा । विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता त्याचे सातत्य टिकविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी. मोठी स्वप्ने पाहतांना त्याच्या पूर्ततेसाठी गुंतवून घेतले पाहिजे. पालकांनी स्वतःची स्वप्ने मुलांवर लादू नयेत तर त्यांची स्वप्ने साकारण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे प्रतिपादन आयुर्वेदातील संशोधक शास्त्रज्ञ डॉ.गिरिष टिल्लू यांनी येथे केले. चोपडा येथील याज्ञवल्क्य मंडळातर्फे आयोजित विद्यार्थी कौतुक सोहळ्यात डॉ.टिल्लू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एस.के.केंगे होते. 2016-17 या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीत चांगल्या गुणांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला.

प्रारंभी अवधूत ढबू यांनी गणेश वंदना सादर केली. प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय मंडळाचे अध्यक्ष डी.व्ही.याज्ञीक यांनी करुन दिला. स्वागत डॉ.विकास हरताळकर व केंगे यांनी केले. विद्यार्थ्यांना ’मन मे है विश्वास ’या विश्वास नांगरे पाटील लिखीत पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना एस.के.केंगे यांनी प्राप्त शिक्षणाची व्यवहाराशी सांगड घाला. व्यावसायिक शिक्षणाकडे वळा, आयुष्यभर नवनवीन शिकण्याचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी याज्ञवाल्क्य मंडळाचे विश्वस्त विजय जोशी, राजेंद्र पाठक, संजय बजाज, सतिष जोशी, कल्पना वैद्य, विजय याज्ञिक, मंगेश वैद्य, अनिल जोशी, श्रीकांत देसाई, डॉ.परेश टिल्लू यांनी परिश्रम घेतले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.