पालकांनी आपल्या मुलांवर विनाकारण अपेक्षांचे ओझे लादू नका

0

सावदा । मुलांवर विनाकारण अपेक्षांचे ओझे लादू नका त्यामुळे त्यांचे मनोवृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते असे प्रतिपादन डॉ नीरज श्याम देव यांनी आं.ग.हायस्कूल मध्ये शताब्दी महोत्सवा निमित्त आयोजित आपल्या पाल्याचे मानवीय वर्तन व बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यानात बोलताना केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा नंदा लोखंडे, शिक्षण सभापती करुणा पाटील, नगरसेविका लीना चौधरी, जयश्री नेहते, शबाना तडवी, जळगाव येथील प्रा. एस.एस.राणे, आं.ग.हायस्कूलचे मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष चौधरी, श्रीकांत वाणी, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका मंगला तळेले उपस्थित होते.

स्पर्धात्मक युगात बुध्दीमतेकडे लक्ष द्यावे
यावेळी व्याख्यानात पुढे बोलताना डॉ देव यानी अनेक मानवीय मानतील पैलू उघडले, जगात मन व मनातील चर्चा याविषयावर जगात फारच कमी चर्चा होते, मनोविकार म्हणजे वेडा होणे नाही, मानसशास्त्रीय आजाराचे जगात सधारण एक हजार ते पंधराशे प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांचे बुध्दीमत्तेकडे मात्र लक्ष न पुरवता फक्त अपेक्षांचे ओझे लादले जात असून याने त्यांना त्रासाच होईल, आपल्या दररोजच्या जीवनात आपण देखील आपल्या अपेक्षा आपण कमी केल्यास सुखी जीवनाची गुरुकिल्ली आपणास गवसेल असे प्रतिपादन डॉ देव यांनी पुढे बोलताना केले.

अंधश्रध्दा ठेवू नका
विनाकारण चिंता हा देखील आजच्या काळात एक आजार असून यामुळे अनेक जण ग्रस्त असून समाधानीवृत्ती बाळगण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला, तर अंगात येणे, भानामती अश्या प्रकारावर बोलताना त्यानी हे सर्व मनोविकारची लक्षणे असून विनाकारण अंधश्रद्धा ठेऊ नका असे देखील सांगितले. तर प्रा.एस.एस.राणे यानी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी तर आभार एस.एम.महाजन यांनी मानले.