पुणे :- आजच्या मुलांचे रोड मॉडेल हे आई-वडील किंवा घरातील वडीलधारी माणसे नसून मोबाईल आणि टिव्हीवरील हिरो आहेत. त्यामुळे आता पालकांना त्यांचे रोल मॉडेल व्हायला हवे. त्यांना स्वतःच्या उदाहरणातून ते दाखवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला यांनी व्यक्त केले. इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘किशोरवयीन मुलांच्या पालकत्वाची आव्हाने व उपाय’ या परिसंवादात ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी ‘आयएमए’च्या नितु मांडके हाउस येथे आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये ‘गरिमा’च्या अध्यक्ष डॉ. वैजयंती पटवर्धन, समुपदेशक स्मिता गणेश, बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती भावे, कायदेतज्ज्ञ व समुपदेशक अॅड. मधुगिता सुखात्मे, अॅड. रमा सरोदे, बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य पूर्णिमा गादिया या पॅनेलिस्टनी सहभाग घेतला. यावेळी आयएमएच्या अध्यक्षा पद्मा अय्यर व आयएमएचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. शुक्ला म्हणाले की, “किशोरवयीन मुले- मुली हे पालक काय सांगतात हे ऐकण्याबरोबरच त्यांचे वर्तन कसे आहे, याचेही निरीक्षण करत असतात. त्यामुळे तुम्ही मुलांना मोबाईल पासून दूर राहायला सांगता आणि स्वतःच जेवताना मोबाईलवर समाजमाध्यमे हाताळत असाल तर मुलांना उपदेश देण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. खरं तर मुले ही पेशन्ट नसून त्याचे प्रश्न पेशन्ट आहे, आणि पालक व आपण सर्व डॉक्टर आहोत” त्यातून सर्वांनी मिळून यावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.