पालकांनी स्वप्नाची पासबुके मुलाकडून न भरता यशस्वी माणूस घडवा

0

चोपडा । सध्या पालक त्यांचे अपूर्ण राहिलेली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी नको ते प्रयत्न करीत असतात. एकप्रकारे रिकाम्या स्वप्नांची पासबुके मुलांकडून भरून न घेता त्यांना जीवनात यशस्वी माणूस म्हणून शिक्षण द्यावे. सध्या बालपणाची स्थिती शिक्षण व्यवस्थेने आणली आहे. प्रौढत्त्वात जेवढा संघर्ष सोसावा लागत नाही तेवढा संघर्ष सध्याच्या शिक्षण व्यवस्थेने आणून ठेवला आहे, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. प्रा. प्रवीण दवणे यांनी येथील चोपडे एज्यूकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिरचा 99वा वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. प्रमुख उपस्थिती संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, उर्मीला गुजराथी, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, चंद्रहास गुजराथी, जीवन चौधरी, शैला मयूर, मुख्यध्यापिका अरुणा पाटील आदी हजर होते.

विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कृतता ही काळाची गरज
24 तास विद्यार्थ्यांना या ना त्या क्लासमध्ये अडकविले ठेवले जाते. फक्त पाठांतरकडे लक्ष दिले जात आहे. घोका, ओका आणि विका अशी स्थिती आजच्या शिक्षण व्यवस्थेची आहे. म्हणून बालपनाला बालपण परत द्या. लहान वयात मुलांना जीव नकोस वाटतं ही स्थिती भयानक आहे. मुलांना कला कौशल्य आपल्या मातीला सुजलाम करण्यासाठी करावे. आपला देश समृद्ध करण्यासाठी जो राबतो त्याचे हातपाय परमेश्वर दाबत असतो. काही शाळांमध्ये केवळ परीक्षाच घेतल्या जातात हे हि चुकीचे आहे. जीवनाच्या तळघरात नववी व दहावीच्या मुलांना ठेऊ नये. क्षमतेच्या शेवटच्या बिंदूपर्यंत अभ्यास करावा मात्र क्षमतेपेक्षा जास्त अभ्यास केला तर मेंदू फाटतो. म्हणून क्षमतेनुसार अभ्यास करावा. जगण्याची भाषा मुलांना शाळेत शिकवली गेली पाहिजे. अवांतर माहिती नसलेले मुले पाठांतरावर पुढे येत आहेत. एका भाषेचे उत्कट ज्ञान ज्याला नाही तो अपूर्ण असतो. माणसाच्या वाटेत सर्व क्षेत्रात अनुसरून ज्ञान असेल तरच तो माणूस होतो.भौतिक ज्ञानाचे कौतुक जास्त होत आहे. रिमोट कंट्रोल चा रिमोट हरवला आहे. सुसंस्कृतता हि काळाची गरज आहे. शिक्षकांनी पिढ्या घडविताना जबाबदारी पूर्वक संस्कार करणे गरजेचे आहे. मोबाईल देणार्‍या पालकांच्या बॅगेत एकही पुस्तक नसते याची खंत व्यक्त केली. 100 वर्षाची गोजिरवाणी लखलखीत परंपरा विद्यालयाने जोपासली आहे. असे भावनिक आवाहन प्रा दवणे यांनी त्यांच्या भाषणातून केले. राष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान वाढेल असा सलाम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले.स्वागतगीत परंपरा सांगणारे आहेत.रवींद्रनाथ टागोरांनी आठवण प्रताप विद्या मंदिरात आल्यानंतर झाली असेही वक्तव्य दवणे यांनी केले.

‘रिओ ऑलिम्पिक’चे प्रकाशन
रमनलाल गुजराथी, एस.एन.बारी, महेश शर्मा, ए.ए.सैय्यद, नितीन गुजराथी, इंदूताई जगताप, हितेंद्र देशमुख, अरविंद गुजराथी यांच्याकडून ऊमाबेन गुजराथी यांच्या स्मरणार्थ इ 10 वी त प्रथम आलेल्या रितू सुभाष सापनर यास सुवर्ण पदक देण्यात आले. वेदान्त नेवे, वैष्णवी जडे, शाहिल अन्सारी, प्रणव सोनार, विनीत पाटील आदी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. क्रीडा शिक्षक डॉ सुधीर चौधरी यांचे ‘रिओ ऑलिम्पिक’ हे हस्तलिखित प्रा. दवणे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. ‘लेख वाचवा, वृक्ष वाचवा’ हे सुदर्शन महाजन या शिक्षकांचे हस्तलिखित प्रकाशित करण्यात आले. संस्थेअंतर्गत दिवंगत सचिव संध्याताई मयूर यांच्या स्मरणार्थ शिक्षकांना दिला जाणारा पुरस्कार प्रताप विद्यालयातील पुरस्कार प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक डी.व्ही. याज्ञिक यांना देण्यात आला.