पालक, पाल्य आणि शिक्षक !

0

मैत्रीपूर्ण संवाद आवश्यक
विद्यार्थ्याला सर्वांसमोर रागावल्यानंतर जवळ घेऊन त्याच्याशी संबंधित शिक्षकाने मैत्रीपूर्ण संवाद करणे अपेक्षित आहे. आपण त्याच्यावर का रागावत आहे, हे त्या शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला स्पष्ट केल्यास त्या विद्यार्थ्याच्या मनात संबंधित शिक्षकाप्रति संताप किंवा भीती निर्माण होणार नाही. शिक्षक आपल्याला रागावतात त्याच वेळी जवळ घेऊन समजावतात, हा विश्‍वास संबंधित विद्यार्थ्याच्या मनात निर्माण झाल्यामुळे तो ऐकण्याच्या मनःस्थितीत येतो. विद्यार्थ्याने ऐकण्याच्या मनःस्थितीत येणे, हेच शिक्षकांच्या प्रयत्नांचे फलित आहे तसेच त्यांच्या प्रयत्नांची पोच पावती आहे. शिक्षक मारुनपिटून हे कधीच साध्य करू शकत नाही. हे सध्याच्या नव्या पिढीतील शिक्षकांनी समजून घेणे गरजेचे आहे.

विरार येथील सकवार, वांगड गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काठीने मारझोड करण्याची शिक्षा केली. त्यामुळे त्या शिक्षेला घाबरून पळालेल्या तीन विद्यार्थ्यांचा शाळेच्या कुंपणाला लागून असलेल्या सुक नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. विद्यार्थ्यांना नदी पार करायची होती. परंतु, नदीच्या पात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही आणि तिघेही विद्यार्थी पाण्यात बुडून मृत पावले. तीन दिवसांनंतर या विद्यार्थ्यांचे मृतदेह त्या ठिकाणी नदीच्या पात्रात किनार्‍याला लागलेले निदर्शनास आले आहे. या घटनेने वांगड गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल चालवणार्‍या वांगड ट्रस्टचा मनमानी कारभार चर्चेत आला. इयत्ता नववीमध्ये शिकणारे प्राहुल पटेल, मीत छाडवा, कुशल डाग, अशी या तीन दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे होती. परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही म्हणून शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना काठीचे फटके मारले. काठीने फटके देण्याची अर्धी शिक्षा पूर्ण झाली आणि अर्धी शिक्षा नंतर देण्याचा निर्णय घेतला. उर्वरित शिक्षा वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घाबरून शाळेतून पलायन केले. संबंधित बाब तीनही विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कळवली होती. येथे शिक्षकांकडून कठोर मारहाण होत आहे, छडीने मारण्याची शिक्षा करत आहेत, अशी कल्पना तीनही विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना दूरध्वनीवरून दिली होती. उर्वरित शिक्षा होऊ नये, या भीतीने विद्यार्थ्यांनी शाळेतून पलायन केले. याशिवाय पालकांकडूनही अशा शिक्षा दिल्या जातात. सोशल मीडियातून अशीच एक क्लिप व्हायर होत आहे. ज्यात आई मुलाला पाढे शिकवत आहे. त्यासाठी प्रत्येक चुकीला एक कानपटात मारत आहे. साडेतीन-चार वर्षांचे पोर चांगलेच भांबावल्याचे दिसत होते.

डीएड, बीएड अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आधारित विषयाचा समावेश करा!
घडल्या प्रकरणात शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रति अवास्तव अपेक्षा बाळगल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याची बळजबरी करून बुद्धिमत्ता वाढत नसते. बुद्धिमत्ता ही काही कृत्रिमरीत्या वाढणारी गोेष्ट नाही, नैसर्गिकरीत्या ती प्रत्येकाला त्या त्या प्रमाणात प्राप्त झालेली असते, अशा विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी अनेक मार्ग आहेत. अभ्यास न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचे अनेक कंगोरे आहेत. संताप करून या विद्यार्थ्यांमध्ये बदल होणे शक्यच नाही, अशा विद्यार्थ्यांच्या कलेने घेऊन त्यांना अभ्यासाकरिता सक्षम करणे, हे शिक्षकांसाठी एकप्रकारचे आव्हान असते. मात्र, सर्व काही झटपट उपलब्ध व्हावे, या सध्याच्या मानसिकतेतून शिक्षकही सुटले नाही. आपण शिकवलेले विद्यार्थ्यांना पटकन समजले जावे, त्यांनी परीक्षेत सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे अचूक सोडवावीत, आपल्या विषयाचा निकाल चांगला लागावा, अशा अपेक्षा शिक्षक धरतात. त्या अपेक्षेला अनुसरून एखादा विद्यार्थी नसेल, तर मग त्यांचा प्राहुल पटेल, मीत छाडवा आणि कुशल डाग होतो. तज्ज्ञांशी यासंबंधी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून या समस्येवर तज्ज्ञांनी अनेक सूचना केल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला खरोखर वारंवार सांगून तो अभ्यास करत नसेल, तर त्याला शब्दांचा मार द्यावा. मात्र, त्याच वेळी शाळा सुटल्यावर त्या विद्यार्थ्याला जवळ घेऊन त्याच्याशी संबंधित शिक्षकाने मैत्रीपूर्ण संवाद करणे अपेक्षित आहे. आपण त्याच्यावर का रागावत आहे, हे त्या शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला स्पष्ट केल्यास त्या विद्यार्थ्याच्या मनात संबंधित शिक्षकाप्रति संताप किंवा भीती निर्माण होणार नाही. शिक्षक आपल्याला रागावतात त्याच वेळी जवळ घेऊन समजावतात, हा विश्‍वास संबंधित विद्यार्थ्याच्या मनात निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी ऐकण्याच्या मनःस्थितीत येतो. विद्यार्थ्याने ऐकण्याच्या मनःस्थितीत येणे, हेच शिक्षकांच्या प्रयत्नांचे फलित आहे तसेच त्यांच्या प्रयत्नांची पोच पावती आहे. शिक्षक मारुनपिटून हे कधीच साध्य करू शकत नाही. हे सध्याच्या नव्या पिढीतील शिक्षकांनी समजून घेणे गरजेचे आहे. काही शिक्षक उतावीळ स्वभावाचे बनलेले आहेत. आपण शिकवलेले विद्यार्थ्यांना समजलेच पाहिजे, असा आग्रह ते धरत असतात, त्यासाठी ते विद्यार्थ्यांना अघोरी शिक्षा करतात. नव्या पिढीतील शिक्षक हे बरेच अवगुणांनी युक्त आहेत. त्यामुळे दुर्दैवाने या शिक्षकांना लहान मुलांना कसे हाताळावे, याचे प्रशिक्षण देणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन अध्यापक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात यासंबंधीच्या विषयाचा समावेश केल्यास ते अधिक सोपे होण्याची शक्यता आहे. जेणेकरून शिक्षक अध्यापकीय शिक्षण घेत असतानाच आदर्श शिक्षक होण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागेल.

पालकांनीही दिवसातील काही काळ शिक्षकाच्या भूमिकेत राहणे आवश्यक!
अशा प्रकारामुळे शाळांच्या व्यवस्थापकांनीही शिक्षकांच्या अध्ययन प्रक्रियेच्या पद्धतीचे वेळोवेळी परीक्षण करणे गरजेचे बनले आहे. प्रत्येक शिक्षक अध्ययन करत असताना त्यांच्यातील गुणवत्ता पडताळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राध्यापकांनी स्वतःहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांकडून एखाद्या शिक्षकाप्रति येणार्‍या तक्रारींची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकाला जाब विचारून त्यांना अध्ययनाच्या प्रक्रियेत बदल करण्यास भाग पाडण्याची आवश्यकता आहे. वांगड गुरुकुल इंटरनॅशनल शाळेच्या प्र्रकरणात शाळेच्या व्यवस्थापकाचा शिक्षकांवर अंकुश असल्याचे दिसत नाही. अशा शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या गोष्टी घडत असतील, तर संबंधित शिक्षकांसह शाळेच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. जेणेकरून शाळेचे व्यवस्थापक जबाबदारीविषयी सतर्क राहील. एखाद्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगल्भता नसेल, तर त्याच्या क्षमतेनुसार त्याचा शैक्षणिक विकास त्याच्या कलेने करण्याचा प्रयत्न करणे, मात्र त्याचबरोबर त्याच्यात क्रीडा अथवा अन्य कलागुण असतील, तर त्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्या दिशेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येणार नाही. जसे शिक्षकांची जबाबदारी असते, तशी जबाबदारी पालकांचीही आहे. पालकांनीही दिवसातील काही काळ शिक्षकांच्या भूमिकेत राहणे गरजेचे आहे. आपला पालक कितपत अवगुणी आहे, याचे प्रामाणिकपणे आणि तटस्थपणे परीक्षण करून त्यानुसार त्याला शिस्त लावण्यासाठी पालकांनी प्र्रयत्न करणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी त्याला शिक्षाही करावी. आपण केलेल्या चुकांना शिक्षा मिळते, असा संस्कार सध्याच्या मुलांच्या मनावर होणे हेही तितकेच गरजेचे आहे, तरच ते चुका करताना घाबरतील. त्याच वेळी अभ्यासाच्या विषयाबाबत पालकांनीही त्यांच्या पाल्याप्रति अवास्तव अपेक्षा बाळगू नये. त्यांनीही पाल्याची शैक्षणिक क्षमता ओळखून त्याप्रमाणे पाल्याला हाताळणे गरजेचे आहे. परीक्षेत पहिलाच क्रमांक मिळव, 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळव, अशी सक्ती केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड ताण येऊन विद्यार्थी आत्महत्या करतात, या घटना आता नित्याच्या बनल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपला पाल्य म्हणजे बाजारातील उत्पादन आहे, असे समजू नये.

– नित्रानंद भिसे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8424838659