पुणे । तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत पालखीतळांसाठी शासनाने सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पालखीतळांची विकास कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात पालखीतळांच्या विकासकामांची आढावा बैठक नुकतीच झाली. या बैठकीला पुरंदरचे प्रांत अधिकारी संजय आसवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजयकुमार भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी प्र. के. केंभावी आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीला उपस्थित होते.
10 कोटींचा निधी उपलब्द
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी, देहू आणि सासवड येथून पंढरपूरकडे रवाना होतात. ज्या गावात पालख्या मुक्कामाला असतात त्या पालखीतळांचा विकास करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून पालखीतळांना संरक्षक भिंत बांधणे, स्वच्छतागृहांची उभारणी यासह पालखीतळांचे सपाटीकरण अशी विविध विकासकामे करण्यात येत आहेत.
अतिक्रमणेही दूर होणार
पहिल्या टप्प्यात सासवड, जेजुरी, वाल्हे, यवत, वरवंड, लोणी-काळभोर, बारामती, सणसर, अंथुर्णे, इंदापूर, सराटी, निंभोरे ओढा, निरवांगी येथील पालखीतळांचा विकास केला जाणार आहे. प्रस्तावित कामे मुदतीपूर्वी करा. 31 मार्चपर्यंत कामे पूर्ण झाली पाहिजेत. ज्या ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली आहेत ती दुर करण्यासाठी त्याठिकाणी पोलिसांची मदत घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राव यांनी दिल्या आहेत.