नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा इशारा : जिल्हाधिकार्यांना निवेदन
इंदापूर । श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत इंदापूर शहरात पालखी तळाचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नुकताच भूमीपूजनाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी शासनाच्या वतीने पालखी मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. वास्तविक मागील शंभर वर्षापासून नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम होतो. परंतु पुढील काळात पालखीचा मुक्काम शहराबाहेरील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात होणार आहे. पालखी तळाची ही जागा बदलली नाही तर शहरवासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी दिला आहे.
जगत्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळा इंदापुरात होतो. परंपरेप्रमाणे वर्षानुवर्षे पालखी मुक्काम इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये असतो. जिल्हाधीकार्यांनी 5 जानेवारी 2018 रोजी एन. पी. ईन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. कंपनीला पालखी तळ करण्याचा कार्यालयीन आदेश दिलेला आहे. परंतु सदर आदेशावर इंदापूर शहरातील जागेचा उल्लेख आढळत नाही.
जागेची पाहणी न करताच निर्णय
उपायुक्त पिंपळगावकर यांनी 5 फेबु्रवारी 2018 रोजी औद्योगीक प्रशिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्थेचे कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालय, तसेच नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी येऊन जागेची पाहणी करणे आवश्यक होते. त्यांनी मात्र, फक्त औद्योगीक प्रशिक्षण संस्था या एकाच जागेची पाहणी केली. याबाबत संबधीत अधिकार्यांना विचारले असता त्यांनी ही फक्त पाहणी असून या ठिकाणी पालखी तळ होणार आहे किंवा नाही याबाबत माहीती नाही असे उत्तर दिले.
नारायणदास विद्यालयातच पालखी तळ उभारा
3 मार्च 2018 रोजी इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी अचानक पालखी तळाच्या कामाचे भूमीपूजन केल्यामुळे शहरवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्यशासनाने नारायणदास रामदास विद्यालयाच्या प्रांगणातच पालखी तळ करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व देहू गावातील तुकाराम महाराज पालखीप्रमुख यांच्याकडे केली आहे. पालखी तळ व मल्टिपर्पज हॉल नारायणदास रामदास हायस्कूलच्या मैदानात करण्यात यावा. यासाठी नगरपरिषद तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची माहिती नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.