पालघर (वैभव पालव)। नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या सागरी, डोंगरी व नागरी विभागाच्या प्रचंड समस्या आहेत. या समस्या प्राधान्याने सोडवून पायाभूत विकासाला चालना देत कालबद्ध पध्दतीने जिल्ह्याची उभारणी करून राज्यातील नवीन असलेला हा जिल्हा सर्वात विकसित जिल्हा म्हणून निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. पालघर जिल्ह्याच्या प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते.
पायाभूत सुविधांची गरज
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्हा हा सांस्कृतिक वैविध्याने नटलेला, आदिवासी संस्कृती व परंपरा आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असताना दुर्दैवाने या जिल्ह्याची ओळख कुपोषणाने होतेय. हा डाग पुसण्याचे महत्त्वाचे काम या सरकारच्या काळात सुरू आहे. कुपोषण व बालमृत्यूची समस्या संपूर्णतः नष्ट करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करून दीर्घकालीन कृती कार्यक्रम राबवणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. नवीन जिल्हा असल्याने कालबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवल्याशिवाय अपेक्षित गतीने विकास करता येणार नाही. यासाठी सिडकोला पाचारण करून प्रशासकीय भवनाच्या बांधकामासोबतच तसेच नवनगर वसवण्याकरिता सुमारे सहाशे कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.
जिल्ह्यात परिवर्तन घडवणार
पर्यटनाच्या माध्यमातून या भागात रोजगार निर्मिती करून रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला. जिल्हा निर्मितीनंतरच्या तीन वर्षांत ज्या गतीने शासन जिल्ह्याच्या विकासासाठी उपाययोजना आखत आहे. ते पाहता येत्या काळात पालघर जिल्ह्याला नवे रूप प्राप्त होईल असे म्हणत शासन, प्रशासन व जनतेच्या साहाय्याने जिल्ह्यात परिवर्तन आणता येईल असेही फडणवीस म्हणाले. याप्रसंगी खासदार चिंतामण वनगा, कपिल पाटील, आमदार आनंद ठाकूर, रवींद्र फाटक, विलास तरे, पास्कल धनारे, अमित घोडा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
गुणवत्तावाढीच्या प्रकल्पाचे उद्घाटन
आदिवासी विकास विभागाकडून चालवल्या जाणार्या आश्रमशाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून इंग्रजी शिक्षणासाठी करडी पथ व विज्ञान शिक्षणासाठी एकलव्य प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पांच्या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान आदिवासी विकास विभाग व संबंधित संस्था यांच्यात यावेळी करण्यात आले. यावेळी या प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रकल्प चारशे आश्रमशाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा
पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी भाषणात मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले असतील तर त्यानुसार जितका निधी लागेल तितका देण्याचे मान्य करत जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा दिला.
प्रकाश निकमांचा आकांडतांडव
कार्यक्रमस्थळी सभामंडपात विशेष निमंत्रितांसाठी असलेल्या कक्षात जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांना बसण्याची व्यवस्था नसल्याचे कारण पुढे करत शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते प्रकाश निकम यांनी एकच आकांडतांडव करत सदस्यांसह जमिनीवरच बैठक मारल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
टास्क फोर्सच्या साहाय्याने विशेष जलसंधारण योजना राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
राज्यातील सर्वात चांगला जिल्हा उभारताना सिडको सुमारे 3 हजार कोटींची गुंतवणूक येथे करणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर प्रशासकीय भवन पालघर जिल्ह्याचे असेल यात कोणतीही शंका नसल्यचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या प्रशासकीय भवनाची इमारत केवळ सुंदर असून भागणार नाही तर येथील सामान्य माणसाला हे आपले कार्यालय वाटायला हवे. या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय देण्याचे, त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम झाले तरच जिल्हा निर्मितीचा उद्देश सफल होईल असे म्हणता येईल. असे म्हणत जव्हार – मोखाड्यासारख्या दुर्गम भागात 3 हजार मिलीमीटर पाऊस पडूनदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. त्याकरिता तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून मल्टी टास्क फोर्सच्या साहाय्याने व तांत्रिक संस्थाच्या मदतीने विशेष जलसंधारण योजना राबण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला दिले.