पालघरमध्येही मनसे आक्रमक

0

पालघर । पालघरमध्ये मनसेने फेरीवाले विरोधात ‘खळ्ळ्खट्याक’ आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर विचारमंथन करण्यासाठी पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी मनसेचे शिष्टमंडळ व संबंधित सर्व अधिकारी वर्गासह संयुक्तिक बैठक घेऊन, फेरीवाले हटवण्यासाठी अधिक सक्षमपणे कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. पालघर आणि बोईसर शहरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतरित्या फेरीवाले बसत आहेत. यामुळे सर्व सामान्य जनतेला रस्त्यावर चालणेदेखील कठीण झाले आहे. प्रशासन या फेरीवाल्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून हा मुद्दा मार्गी लावावा. अन्यथा फेरीवाल्यांविरोधात ‘खळ्ळ्खट्याक’ आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीने दिला असल्याने या इशार्‍यानंतर तहसीलदार यांनी आश्‍वासन देऊन आज बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पालवे, गट विकास अधिकारी संबंधित ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व मनसे शिष्टमंडळासह संयुक्तिक बैठक घेतली.

या बैठकीत अनधिकृतरीत्या फेरीवाले हटावबाबत चर्चा होऊन, येत्या आठवड्यात कृती आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश तहसीलदारांनी उपस्थित संबंधित अधिकार्‍यांना दिले तसेच पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून, पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.

शहर फेरीवालामुक्त करण्याची मागणी
प्रशासनाने जर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली नाही, तर त्यांना मनसेच्या स्टाईलने दणका दिला जाईल, असा इशारा माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला. आमची शहरे फेरीवाला मुक्त करा,अन्यथा खळ्ळ खटयाकची भाषा बोलावी लागेल. असे स्पष्ट मत मनसे जिल्हा उपाध्यक्ष अनंत दळवी यांनी व्यक्त केले. फेरीवाल्यांमुळे होणारी प्रचंड वाहतूककोंडी व सर्वसामान्य जनतेस होणारा जीवघेणा त्रास याला प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे पालघर शहर अध्यक्ष सुनील राऊत यांनी केला. सदर शिष्टमंडळात ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी, सिटीजन फोरमचे प्रतिनिधी, पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, उपाध्यक्ष चेतन वैद्य, चेतन संखे, मनविसे उपजिल्हा अध्यक्ष धिरज गावड, केळवा विभाग अध्यक्ष संदीप किणी, सफाळे विभाग अध्यक्ष मंगेश घरत, विभाग अध्यक्ष रत्नदीप पाखरे, खैरेपाडा विभाग अध्यक्ष तन्मय संखे शाखा अध्यक्ष विपुल गोराणे, सत्यम मीश्रा, नयन पाटील आकाश भोईर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.