सफाळे (नवीन पाटील) । ग्रामविकास विभागाच्या शिक्षक बदल्या संदर्भातील जिआरनूसार पालघर जिल्हा परिषदेतिल कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडली. बदली प्रक्रिया होऊन दोन महिने उलटून गेले तरिही बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न केल्यामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत. प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात पालघर जिल्ह्यातिल शिक्षक जि.प. विरोधात 16 तारखेला आंदोलन करणार आहेत. या विषयी सविस्तर माहिती अशी की, दोन महिन्यापुर्वी पालघर जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतिने पार पडली. यामध्ये इतर जिल्ह्यातील 229 शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया होऊन 229 शिक्षकांच्या बदल्या झाल्या सर्वांची कागदपत्र पडताळून झाली. तरिही आजतागायत शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही. पालघर जिल्ह्यात शिक्षक संख्या कमी असल्याचे कारण देऊन प्रशासन व राजकिय पदाधिकारी यांनी शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास विरोध केला. परंतु 49 शिक्षक जिल्हा बदलीने व 70 शिक्षक समुपदेशनाने असे एकुण 120 शिक्षक पालघर जिल्ह्यात हजर झाले आहेत. तरिही आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्ताचे आदेश मिळालेलेच नाहीत. यामागे आर्थिक हितसंबंध लपले असण्याची शक्यता शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
बदली झालेले शिक्षक अनेक वर्षांनंतर स्वतः च्या जिल्ह्यात कुटुंबासोबत राहून नोकरी करायला मिळेल या आनंदात होते. स्वत:च्या जिल्ह्यात बदली झाली म्हणून अनेक शिक्षकांनी नातेवाईक व इतरांकडून उसणवारी करुन पतपेढी व इतर बँकाचे घेतलेले कर्ज चुकते केले. यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे. काही शिक्षकांनी तर आपला पसारा गावाकडे हलवला आहे. आज याच शिक्षकांनी स्वत:च्या गावी जायची तयारी केली असून कार्यमुक्तीच्या आदेशाची वाट पाहत बसले आहेत. तर दुसरीकडे दोन महिने उलटूनही आदेश मिळलेलेच नाहीत. यामुळे शिक्षकांची कुचंबना होत आहे. अनेक वेळा अर्ज विनंत्या करुनही आदेश मिळत नसल्याने जि.प.च्या अन्यायकारी धोरणा विरोधात शिक्षक 16 सप्टेंबर रोजी आंदोलन पुकारणार आहेत. तसेच 30 सप्टें.च्या आगोदर कार्मुक्त न केल्यास बेमुदत उपोषण करण्याची भुमिका शिक्षक घेणार आहेत.
जिल्ह्यातील 229 शिक्षकांवर वेळ येणार उपासमारीची
आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या रिक्त दाखविण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु आहे. जर या रिक्त जागेवर जिल्हांतर्गत बदली झालेले शिक्षक आले तर पुन्हा वेतन काढण्याचा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे ’न घर का न घाट का’ अशी परिस्थिती शिक्षकांची झाली आहे. यामुळे बदली झालेले 229 शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे हे शिक्षक सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत आहेत. अशाने विद्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.