मुंबई-पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असताना आता मतदारांना पैसे वाटप केले जात आहे. अशाच पैसे वाटणाऱ्या १२ जणांना शिवसैनिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. दरम्यान, हे पैसे भाजपकडूनच वाटले जात असल्याचा आरोप करत राजेंद्र गावित यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. भाजपने मात्र या आरोपांचे खंडन करताना हा शिवसेना भाजपला बदनाम करत असल्याचे आरोप केले आहे.
भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या मुलाला शिवसेनेने उमेदवार दिल्यानंतर या मतदारसंघात शिवसेना- भाजपातच चांगलीच चुरस वाढली आहे. भाजपने काँग्रेसमधून अालेल्या राजेंद्र गावितांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणू येथील रानशेत भागात पैसे वाटप सुरू असल्याची माहिती शिवसेनेला मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार अमित घौडा यांनी तिथे जाऊन पैसे वाटणाऱ्यांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी भाजप पदाधिकारी आंबोरे यांनी पैसे वाटण्यास सांगितल्याचे या तरुणांनी सांगितले. ही बातमी कळताच एकनाथ शिंदे, अनिल देसाई, संजय राऊत या शिवसेनेच्या नेत्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा असल्याने सर्व नेते डहाणूत होते. शिवसैनिकांनी पकडलेल्या प्रत्येक तरुणांकडे ३५ पाकिटे होती, त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये होते.