पालघरातील धोकादायक इमारतींच्या आकड्यांमध्ये झोल!

0

मुंबई:- पालघर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या आकड्यांमध्ये घोळ असून सरकारने सांगितलेल्या आकड्यांपेक्षा जास्त लोकं तिथे राहत असून कधीही दुर्घटना होऊ शकते अशी धक्कादायक माहिती विधानपरिषदेत सदस्य आनंद ठाकूर यांनी दिली. जे लोक तिथून निघत नाहीत त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, त्यांची व्यवस्था काय करणार? असा सवाल ठाकूर यांनी केला असता सर्वेक्षण करून यादी तयार करून सहानुभूतीने स्थानिक स्तरावर काही मार्ग काढता येईल का यावर विचार करू असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. दरम्यान सरकारी आकड्यांमध्ये झोल असून सरकार संवेदनशील मुद्द्यावर गंभीर आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. पालघरच्या धोकेदायक इमारतींबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

धोकेदायक नसलेल्या इमारतीही खाली!
या चर्चेत भाई जगताप यांनी कायद्याच्या चौकटीत नाही मात्र मानवीय दृष्टीने पावसात काही व्यवस्था आहेत त्यांची व्यवस्था करणार का? तात्पुरती तरी व्यवस्था करणार का असा प्रश्न विचारला असतात पाटील यांनी सहानुभूतीने स्थानिक स्तरावर काही मार्ग काढता येईल का यावर विचार करू असे सांगितले. निरंजन डावखरे यांनी 15 बिल्डिंग धोकादायक पालघरमध्ये असून प्रश्न लागला हे माहिती झाल्यानंतर 52 लोकांना हलविले असल्याचे सांगितले. यावेळी दुसरी बाजू तपासावी, चुकीच्या पद्धतीने बिल्डिंग खाली केल्या जात आहेत. धोकादायक नसलेल्या बिल्डिंगही खाली केल्या जातात, यासाठी काही व्यवस्था करणार का? असाही सवाल डावखरे यांनी केला. यावर तपास करून अहवाल ठेवतो, असे पाटील यांनी सांगितले.

इमारती निष्कासित करणे आवश्यक
हेमंत टकले यांनी या बिल्डिंग किती जुन्या होत्या. बिल्डिंग बांधल्यावर योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी काही व्यवस्था आहे का? असे विचारले असता राहायला जागा नसल्याने बाहेर पडत नाहीत असे पाटील यांनी सांगितले. नगरपालिका स्तरावर बांधकाम तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भोगवटादारांना इमारत रिकामी करण्याबाबत नोटिस बजावण्यात आली असून या इमारती निष्कासित करणे आवश्यक असल्याचेही पाटील यांनी सांगितले.पालघरमध्ये सर्वेक्षण केले असता सात इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या इमारतीत 15 भोगवटदार असून या इमारतीत 72 रहिवासी राहत होते. नोटिस दिल्यानंतर 54 रहिवाशांनी अन्य ठिकाणी स्थलांतर केले असून 18 रहिवासी तिथेच रहात आहे. त्यांनी सुद्धा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, याबाबत नगरपरिषदेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.