पालघर जिल्हयात बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे

0

मनोर (सुमित पाटील) : पालघर जिल्हयातील शिक्षकांची संख्या कमी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी पालघर जिल्हयात बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

मंत्री मुंडे यांच्या विधान भवनातील दालनात पालघर जिल्हयातील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आमदार पास्कल धनारे, अमित घोडा, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांची उपस्थिती होती.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी आहे अशा शाळेतील मुलांना शेजारी एक ते दिड किलोमीटर अंतरावरील शाळेत सामावून घेण्याचा विचार करावा. ज्या शाळेत जाण्यास नदी, नाले, रेल्वे, हायवे अशा प्रकारच्या अडचणी नसतील अशा शाळेत समावेश करण्यात येण्याचा विचार करावा अशा सूचना दिल्या.

पालघर जिल्हयात बदली होवून येणाऱ्या शिक्षकांची संख्या 49 आहे. एवढ्याच शिक्षकांना पहिल्या टप्प्यात सेवाज्येष्ठतेनुसार जिल्हयाबाहेर पाठविण्यात यावे. नंतरच्या टप्प्यात उर्वरीत शिक्षकांना पालघर जिल्हयातून कार्यमुक्त करण्यात यावे असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिले.