पालघर । मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटनेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर असलेल्या पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून हे पूल फेरीवालामुक्त करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने बोईसर येथील रेल्वेच्या अधिकार्यांकडे केली. मुंबईतील घटनेनंतर रेल्वे पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवरील पादचारी पूल जीर्ण झाले आहेत. त्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक डागडुजी करणे गरजेचे आहे.
बोईसर रेल्वे अधिकार्यांना मनसेकडून निवेदन
वसई, नालासोपारा, विरार, पालघर, बोईसर, डहाणू यासारख्या प्रवाशीसंख्या मोठी असलेल्या रेल्वेस्थानकात पादचारी पुलांवर फेरीवाले बसण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. असे असताना रेल्वे प्रशासन यासंदर्भात उदासीन असल्याचे दिसत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हासचिव सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बोईसर येथील रेल्वे अधिकार्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील रेल्वे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, पादचारी पूल फेरीवाला मुक्त करा यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.