मुंबई । पालघर जिल्ह्यात पावसाळ्यानंतरच्या पूर्वार्धात कुपोषणामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे. मात्र त्यामुळे असून पूर्णपणे समाधानी नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. त्यांनी डहाणू, तलासरी भागाचा दौरा केला. गेल्या तीन वर्षांतील माहे एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या बालमृत्यूची आकडेवारी पाहता यावर्षी बालमृत्यू रोखण्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी डहाणू, तलासरी या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व पाड्यांना भेटी दिल्या. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी कुपोषित बालकांच्या गृहभेटी देऊन प्रकृतीची विचारपूस केली. आरोग्यमंत्र्यांनी डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सरावली उपकेंद्र, पाटीलपाडा, पारसपाडा, चरी उपकेंद्र, वडवली उपकेंद्र, डोंगरीपाडा, जिल्हात पाडा येथील तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांच्या घरी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाल उपचार केंद्रातून घरी सोडण्यात आलेल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी पालकांना केले.
गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी 50टक्के घट
गेल्यावर्षी याच काळात 93 बालमृत्यू झाले होते, यावर्षी 38 बालमृत्यू झाले असून त्यातील 8 मृत्यू हे अपघाती आहेत. आरोग्य यंत्रणेने बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना यश येत असून अजूनही पूर्णपणे समाधानी नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार बालकांना व्हिसीसीडी, सीटीसी किंवा एनआरसी मध्ये दाखल केले जाते. सॅम, मॅम मुलांसाठी सर्व अंगणवाडी केंद्रात बालविकास केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्यम कुपोषित बालकाला झोळीत झोपवले जाते, मात्र यामुळे त्याला श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे बालकांना झोळीत झोपवल्यावर झोळीला काठ्या लावाव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. उपचार केंद्रातून बालक घरी आल्यावर त्याची निगा कशी राखावी याबाबत अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्तीने मार्गदर्शन करावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. वाडा ग्रामीण रूग्णालय, जव्हार व मोखाडा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकूण 9 ठिकाणी आरोग्य संस्थामध्ये बाल उपचार केंद्र सुविधा उपलब्ध आहे.
तपासणी करून लसीकरण
डहाणू, वाडा,विक्रमगड तालुक्यातील 10 प्राथमिक आरोग्य केद्रावर बाल उपचार केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तसेच जव्हार व मोखाडा तालुक्यातील 0-6 महिने वयोगटातील सर्व बालकांना एक दिवसाआड तसेच 7 महिने ते 1 वर्ष या वयातील बालकांची दर 15 दिवसांनी आशा सेविकामार्फत भेट देऊन त्यांच्या आरोग्याबाबतच्या परिस्थितीची नोंद ठेवण्यात येत आहे. अंगणवाडीमधील सर्व बालकांचे वेळापत्रकानुसार लसीकरण करण्यात येत असून आरोग्य केंद्र स्तरावर सॅम, मॅम श्रेणीमधील बालकांची व आजारी मुलांची तपासणी करून आवश्यक उपचार दिले जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत सर्व मुलांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहीती देण्यात आली आहे.
विविध शिबीरातून तपासणी
आदिवासी तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व 0 ते 6महिने वयोगटातील मुले तसेच सॅम व मॅम श्रेणीतील मुलांची प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालय स्तरावर शिबिरे आयोजित करून तज्ञांमार्फत तपासणी करण्यात येते. जिल्ह्यातील स्थलांतरीत लाभार्थ्यांसाठी विशेष पुनरागमन शिबीरे आयोजित केली जातात, स्थलांतरीत झालेले लाभार्थी जिल्ह्यात परत आल्यावर त्यांच्यासाठी शासकीय व खाजगी रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ व इतर तज्ञ यांच्यामार्फत विशेष आरोग्य शिबीर आयोजित करून त्यांची तपासणी केल्याने आरोग्यमंत्र्यांनी कळविले.