मुंबई – पालघर जिल्ह्यात पावसाळ्याच्या हंगामात आदिवासी बांधवांना पाड्यावर जाऊन धान्य देण्यासाठी धान्य महोत्सव संकल्पना राबविण्यात येणार असून येत्या १५ जूनपासून पुनरागमन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये माता-पित्यांसोबत स्थलांतरीत झालेले आणि आता परतलेल्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरात मोखाड्यामध्ये एकही बालमृत्यूची घटना आढळून आली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान आपण पालघर टास्क फोर्स समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला, असे त्यांनी सांगितले.
15 जूनपासून 26 संवेदनशील पाड्यांना भेटी
पालघर जिल्ह्यात कुपोषणाच्या बाबतीत 26 संवेदनशील पाडे असून 15 जूनपासून या पाड्यांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती यांचा गट तयार करुन कुपोषित बालकांच्या संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. कुपोषित बालकांची माहिती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे सावंत म्हणाले.
पुनरागमन शिबिरांचे आयोजन
पालघर जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी बांधव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये रोजगारासाठी स्थलांतर करतात. आई-वडिलांसोबत लहान मुलेदेखील स्थलांतरीत होतात. ही मंडळी जूनमध्ये पुन्हा पाड्यावर परतात. अशा परत आलेल्या माता व मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुनरागमन शिबिर आयोजित करण्यात येणार असून खाजगी बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येईल. या शिबिरांच्या माध्यमातून अतितीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. ज्या भागात स्थलांतर होते तेथील आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून स्थलांतरीत झालेल्या बालकांवर उपचार व तपासणी करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
माहेर योजना पुन्हा कार्यान्वित
राज्य शासनाने माहेर योजना पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेंतर्गत गरोदर मातेला व तिच्या बाळाला निवासाची सोय आहार, वैद्यकीय उपचार या ठिकाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची तालुकानिहाय यादी तयार करण्यात येत असून त्यांच्याकडे विशेष लक्ष केंद्रित करुन आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
धान्य महोत्सव
आदिवासी पाड्यावरील दारिद्रय रेषेखालील सर्व लाभार्थ्यांसाठी धान्य महोत्सव आयोजित करून पाड्यांवर धान्यवाटप करण्यात येईल. त्यामुळे पावसाळ्यामध्ये आदिवासी बांधवांना घरपोच धान्य मिळू शकेल. पालघर जिल्ह्यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील चार रूग्णवाहिका या भागात कायमस्वरूपी ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.