पालघर-रायगड परिसरात पावसाचा कहर

0

दोन दिवस जोरदार पावसासह वादळी वार्‍याचा तडाखा, जनजीवन विस्कळीत, संततधार पावसाने घराबाहेर पडणे झाले अवघड

पालघर । पालघर व रायगड जिल्हांमध्ये दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने कहर केला आहे. मंगळवारी रात्री उशिरापासून अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसामुळे नागरिक त्रस्त झाले असून सर्वत्र संततधार पावसाने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पालघर जिल्ह्यात समुद्र किनार्‍यावरील गावांचे यामध्ये मोठे नुकसान झाले असून अनेक गावांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारपासूनच पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील सावित्री, काळ, अंबा, कुंडलिका या प्रमुख नद्यांच्या पातळीतदेखील हळूहळू वाढ होत आहे. वसईत अनेक ठिकाणी उभी पिके आडवी पडली असून वसईसह परिसरात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माथेरान, नागोठणे परिसरातही वादळी वार्‍याचा तडाखा बसत असल्याने येथील काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

समुद्रकिनार्‍यावरील गावांचे मोठे नुकसान, अनेक गावांतील घरांमध्ये शिरले पाणी

अतिवृष्टीत घरावर झाड कोसळले
दोन दिवस जोरदार पावसाने तसेच वादळी वार्‍याचा तडाखा बसत असल्याने येथील काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पंचशील नगर येथील जनार्दन आखाडे यांच्या घरावर दोन जुनाट झाडे वार्‍यामुळे उन्मळून पडली. या नैसर्गिक आपत्तीत घराचे छप्पर तुटले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. नगरसेवक प्रसाद सावंत, बांधकाम सभापती शकील पटेल, नगरसेविका ज्योती सोणावले यांनी नगरपालिकेच्या आपातकालीन मदत पथकासह भेट दिली व तत्काळ पडलेली दोन्ही झाडे काढण्यास सूचना केल्या.

वसईत उभी पिके आडवी
खानिवडे वसईत मंगळवारपर्यंत संथ गतीने सुरू झालेल्या पावसाने जोर धरत धो धो बरसायला सुरुवात केल्याने वसईतील नागरिकांची तारांबळ उडवली. चालू वर्षी पूर्ण पावसाळ्यात इतका जोराचा पाऊस झाला नव्हता. कमी वेळात जास्त बरसलेल्या पावसामुळे नद्या व नाले क्षणात पाण्याने भरून वाहू लागले. खानिवडे तानसा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. जास्त पाण्याचा परिणाम होऊन तयार होत असलेली भात शेती अनेक ठिकाणी आडवी पडली आहे. ही नैसर्गिक आपत्ती शेतकर्‍यांच्या आशेवर पाणी फेरणारी ठरत आहे. पीक जवळपास तयार झाले असून येत्या दसर्‍यापर्यंत कापणीच्या तयारीतले झाले आहे. पावसाने लोंब्या वाकू लागल्याने भात शेतीचे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे .

रायगड जिल्ह्यालाही मोठा फटका
मंगळवारपासूनच पावसाने जोर धरल्याने रायगड जिल्ह्यातील सावित्री, काळ, अंबा, कुंडलिका या नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यात उभ्या भात शेतीत पावसाचे पाणी साचल्याने आणि भातशेतीवरुन पाणी वाहून गेल्याने भातपिके आडवी होऊन नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.

पालघर जिल्ह्यात समुद्रकिनारी नुकसान
पालघर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पावसाने समुद्रकिनार्‍यावरील गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या केळवे परिसरातही घरांचे व हॉटेल्सची हानी झाली आहे. यामुळे इथे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. केळवे येथील अनेक हॉटेल्सचे पत्रे वादळाने उडून गेले आहेत.

नागोठण्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी
सोमवारी सायंकाळपासून तुरळक पडणार्‍या पावसाने मंगळवारी दुपारपासून पुन्हा जोर धरल्याने येथील अंबा नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे. पाऊस असाच कायम राहिला, तर शहरात पुराचे पाणी भरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.