पालघर-वाडा शेतीमालाला मिळणार हमीभाव!

0

मनोर । वाडा तालुक्यातील शेतकर्‍यांनी पिकवलेला शेतीमाल, भाजीपाल्याला हमी भावाने विकत घेण्याची तयारी या तालुक्यात शेती उत्पादनावर प्रक्रिया करणार्‍या तसेच मार्केटिंग करणार्‍या काही उद्योजकांनी दाखवली आहे. वाडा येथे कुणबी समजाच्या विद्यमाने 26 ते 28 जानेवारी असे सलग तीन दिवस स्नेहसंमेलनाचे आयोजन केले असून या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून भव्य कृषी महोत्सव आयोजित केला आहे. या कृषी महोत्सवात आधुनिक शेती ते कृषी उद्योजक शेतकरी ही संकल्पना साकारली आहे. जवळपास 30 ते 35 विविध शेती उत्पादने, भाजीपाला याची प्रत्यक्ष लागवड केली असून तिला आधुनिकतेची जोड दिल्याने ही उत्पादने कमी खर्चात अधिक कशी घेतली जातात हे दाखवण्यात आले आहे. या कृषी महोत्सवात उत्पादन होणारे पीक सर्वसामान्य शेतकरीही आपल्या शेतात घेऊ शकतो व त्याची हमीभावाने विक्रीही करू शकतो, याची हमी येथील उद्योजक छेडा कंपनीचे मालक अशोक छेडा, मुकुंद एक्सपोर्टचे पंकज गटानी, रिलायंस बिग बाजारचे सप्लायर्सचे अजय यांनी घेतली आहे.

1,000 शेतकर्‍यांशी हमीभावाचा करार
या उद्योजकांनी कुणबी स्नेहसंमेलन अंतर्गत आयोजित केलेल्या कृषी महोत्सव ठिकाणी भेट दिली व या तिन्ही कंपन्यांनी शेतकर्‍यांनी पिकवलेला भाजीपाला व इतर शेती उत्पादने हमीभावाने विकत घेण्याचे आश्‍वासन दिले.या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच या तिन्ही कंपन्या एक हजार शेतकर्‍यांशी हमीभावाचा करार करणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी दिली.