मुंबई – पालघरमध्ये जुन्या आखाड्याच्या दोन साधूंची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय संत समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. या हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्र नंद सरस्वती यांनी हे पत्र लिहिले आहे. समितीने या घटनेचा नक्षलवाद्यांशीही संबंध जोडला आहे. महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. देशमुख यांची भूमिका संदिग्ध आहे. त्यामुळे आमचा सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची गरज आहे, असेही समितीने म्हटले आहे.