सावदा : गत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सातपुडा पर्वतातील सर्वच नदी व नाले भरून वाहू लागल्याने सुकी नदीला मोठा पूर आला. यात गावापासून दोन किमी अंतरावर असलेले दादासाहेब वनप्रशिक्षण संस्थेला जोडणारा पूल वाहून गेल्याने वनप्रशिक्षणार्थी व पर्यटकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. पाल येथे वनमंत्री स्व.मधुकरराव चौधरी यांच्या कार्यकाळात 1961 मध्ये येथे दादासाहेब वनप्रशिक्षण संस्था स्थापन केली होती. यात दरवर्षी दोनशे ते पाचशे वनप्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. येथून जवळच हरीण पैदास केंद्र असून या हरीण पैदास केंद्रातील प्राण्यांना पाहण्यासाठी महाराष्ट्रसह देशभरातून पर्यटक येतात परंतु या वाहून गेलेल्या पुरामुळे वनप्रशिक्षणार्थी विद्यार्थी व कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांना, पर्यटकांना येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. कर्मचार्यांना आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास रात्री-बेरात्री गावात यावे लागते शिवाय जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गावात जावे लागते मात्र हा पूल वाहून गेल्याने येथील कर्मचारी व पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.