पालिकातर्फे थकीत कर भरण्याचे आवाहन

0

नवापूर । नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी नगरविकास विभागाने 1 फेब्रुवारी रोजी शासनाने मालमत्ता व पाणीपट्टी याची 100 टक्के वसुली करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. नवापूर नगरपरिषदेची मालमत्ता कराची एकूण मागणी दोन कोटी 48 लाख 5 हजार 655 रूपयें इतकी असून त्यापैकी केवळ 1 कोटी 21 लाख 86 हजार 497 इतकी वसुली झालेली आहे. यात पाणी पट्टींचे 1 कोटी 16 लाख 34 हजार 987 रूपये येणे असून त्यापैकी 59 लाख 84 हजार 741 रूपयेच वसूल झाले आहेत.

नगरपरिषदेने चार वसुली पथक केले तयार
या वसुलीसाठी नगरपरिषदेने चार वसुली पथक तयार केले आहेत. थकीत करांची वारंवार मागणी करूनही भरणा न करणार्‍या थकबाकीदारांवर नगरपरिषदेतर्फे जप्ती करणे, नळ कनेक्शन बंद करणे यासारखी कारवाई करण्यात येत आहे. जे थकबाकीदार 31 मार्चपूर्वी आपली थकबाकी भरणार नाहीत अशा थकबाकीदार करदात्यांबाबत प्रत्येक महिन्यासाठी 2 टक्के याप्रमाणे शास्ती लावण्यात येणार आहे.

त्यामुळे जे थकबाकीदार गेल्या 2 ते 3 वर्षापासून घरपट्टी व पाणीपट्टी भरत नाही त्यांच्यावर जवळपास 40 ते 50 टक्के शास्तीची रक्कम बोजा म्हणून 31 मार्च नंतर पडणार आहे. कर भरणा स्वीकारण्यासाठी नगरपरिषदेत वसुली विभागाचे कार्यालय सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत उघडे ठेवण्यात येणार आहे. तरी करदात्यांनी तात्काळ पाणीपट्टी व घरपट्टी भरून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा रेणुका गावित व उपाध्यक्ष हारूण खाटीक यांनी तसेच मुख्याधिकार्‍यांनी केले आहे.