पालिका अतिक्रमण विभागाचा कानाडोळा

0

नेरुळ । वाशी पामबीच मार्गावरील कोपरीगाव सेक्टर 26 येथील भूखंड क्रमांक 14 वरील वेंटोन हॉटेल, या हॉटेल मालकाने अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल मालकाने त्याच्या हॉटेलच्या मागील बाजूस मार्जिनल स्पेसमध्ये चार मजली लोखंडी जिना अवैधरित्या उभारला आहे. नवी मुंबईतील नागरिकांच्या घरात डोकावून कारवाई करणार्‍या महापालिकेचे या गोष्टीकडे अजून लक्ष कसे गेले नाही अथवा जात नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे? विशेष म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच हॉटेलच्या मागील बाजूला चिटकून महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या आड येणार्‍या बैठ्या चाळी व दोन धार्मिक स्थळांवर कारवाई केली होती. माजी आयुक्त तुकाराम मुंढे जोपर्यंत नवी मुंबई मनपा सेवेत कार्यरत होते तोपर्यंत मनपाहद्दीत मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणार्‍या व्यावसायिकांवर धडाकेबाज कारवाई होत असे. अगदी दुकानासमोरील फुलझाडांच्या कुंड्यादेखील ठेवण्यास मनाई होती, त्या जप्तदेखील केल्या जात होत्या.

आता तशी कारवाई होताना पाहावयास मिळत नाही. याचाच गैरफायदा काही व्यावसायिक घेत आहे. या हॉटेल मालकाने उभारलेल्या या लोखंडी जिन्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. तेव्हा महापालिकेच्या होणार्‍या दुटप्पी भूमिकेविषयी नागरिकांच्या मनात संशय बळावत चालला आहे. कारवाईसाठी फक्त गोरगरीब निवडले जातात आणि श्रीमंतांना मात्र वेेेगळा न्याय लावला जात आहे. महापालिका अतिक्रमण विभाग आणि या हॉटेल व्यासायिकामध्ये खरंच काही अर्थकारण आहे का? ज्यामुळे कारवाई होत नाही? तर महापालिकेने येथील चाळींवर जशी कारवाई केली अगदी त्याच धर्तीवर या हॉटेलवर कारवाई करण्याचे धाडस पालिका करणार का? असा सवाल ही येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.

नवी मुंबई महापालिकेत तुकाराम मुंढे आयुक्त असतांना अनेक अनधिकृत बांधकांमावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सत्ताधार्‍यांचीही गय केली गेली नव्हती अनधिकृत ते अनधिकृतच अशी धारणा ठेवत अनेक बांधकामे पाडण्यात आली. मात्र, ते जाताच नवी मुंबईत पुन्हा अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याचे बोलले जात असून, पालिकेच्या कारवाईबाबत आता नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधित हॉटेल व्यावसायिकाने हा जिना बांधण्यासाठी परवानगी घेतली आहे का नाही याची कल्पना नाही तसेच या हॉटेल बांधकाम परवानगीबाबत तपासून आपणास कळवतो.
– (महेंद्र सिंग ठोके, वाशी विभाग, अधिकारी)