मुंबई । घाटकोपर येथील सिद्धी साई बिल्डींग कोसळण्याआधी 4 दिवस महापालिकेच्या अधिकार्यांनी त्या इमारतीला भेट देऊन तळमजल्यावरील शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप यांच्या नर्सिंग होमचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासंदर्भातील अहवाल या अधिकार्यांच्या पथकाने सादर केला, त्यात तळमजल्यावर कुठेही दुरुस्तीचे अथवा पुर्नबांधणीचे काम सुरू असल्याचे नमुद करण्यात आले नव्हते.
दरम्यान या इमारतीमधील रहिवाशी वीरेंद्र सिंह म्हणाले, ही इमारत कोसळण्याआधी 10 दिवसांपूर्वी शितप यांनी इमारतीमधील रहिवाशांची बैठक घेऊन नर्सिंग होमच्या दुरुस्तीच्या कामाची परवानगी मिळाली असून त्याप्रमाणे आपण हे काम सुरू करत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी आम्ही त्याला विरोध करून महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र योग्य व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही.
ज्या अधिकार्यांनी येथील नर्सिंग होमबाबतचा अहवाल सादर केला होता, त्यांनी त्यांच्या अहवालात दुरुस्तीच्या कामाचा उल्लेख का केला नाही की त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे. जरी महापालिकेच्या अधिकार्यांनी भेट दिल्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले असेल, तर तेथील रहिवाशांनी तरी यासंबंधी तक्रार करणे गरजेचे होते, असे तेथील मनपाच्या वॉर्ड अधिकारी भाग्यश्री कापसे म्हणाल्या.