पालिका आकारणार सोसायट्यांकडून कचरा उचलण्याचा शूल्क

0

महापालिका हद्दीत 100 पेक्षा अधिक सदानिका असलेल्या गृहप्रकल्पांची संख्या 615

केंद्र सरकारच्या नियमांची लवकरच अंमलबजावणी

पिंपरी चिंचवड : शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांना वारंवार मुदतवाढ देऊनही कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्पांची उभारणी करता आलेली नाही. त्यामुळे आता या गृहप्रकल्पांमधील कचरा उचलण्यासाठी महापालिकेकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नियमांची लवकरच शहरात अंमलबजावणी होणार असल्याचे सुतोवाच महापालिका प्रशासनाने दिले आहे.

कचरा उचलण्यासाठी लाखोंचा खर्च…

महापालिका हद्दीत 100 पेक्षा अधिक सदानिका असलेल्या गृहप्रकल्पांची संख्या 615 एवढी आहे. याशिवाय पाच गुंठ्यापेक्षा अधिक भौगोलिक आकाराच्या गृहप्रकल्पांमध्ये तयार होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. मात्र, या गृहप्रकल्पांकडून अद्यापही ही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे या सोसायट्यांमधील कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. या गृहप्रकल्पांपासून मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्यासाठी महापालिका लाखो रुपये खर्च करत आहे.

महासभेच्या मंजूरीसाठी प्रस्ताव…

या सर्व गृहप्रकल्पांनी आपल्या आवारातच कचरा विघटन यंत्रणा उभारण्याच्या सुचना महापालिका प्रशासनाने दिल्यानंतरही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. अशी बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर या गृहप्रकल्पांना ही यंत्रणा उभारण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. सप्टेंबर अखेर ही मुदत संपुष्टात आली आहे. मात्र अद्यापही या नियमांची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे कचरा उचलण्याबाबत केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याकरिता महासभेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची कार्यवाही केली जाणार आहे.

निविदेची मुदत 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत …

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राटाबाबत स्थायी समितीने यु टर्न घेतल्यानंतरही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. या उलट कचरा उचलण्यासाठी नवीन निविदा प्रसिद्ध केली आहे. शहराच्या एकूण चार विभागांत कचरा उचलण्याच्या या ठेक्यात निकोप स्पर्धा व्हावी, याकरिताया निविदा प्रक्रियेला 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.