पालिका आयुक्तांना हटवा

0

पुणे (राजेंद्र पंढरपुरे)। भाजपचा माणूस असा शिक्का बसलेल्या कुणाल कुमार यांना महापालिका आयुक्त पदावरून हटवा, अशी मागणी भाजपकडूनच केली जाते याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

तुमचा भाटीया करू, असा इशारा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेच्या मुख्यसभेत सोमवारी दिला. या वक्तव्याला अनेक कांगोरे आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने कुणाल कुमार यांची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाद दिली नाही. ही घटना घडून काही महिने जातात न जातात तोच भिमाले उठून आयुक्तांना हटवू म्हणतात. याचा स्पष्ट अर्थ असा की भाजप मध्ये सारे काही आलबेल नाही. त्यामुळे पक्षातही भिमाले यांच्या भूमिकेचे पडसाद उमटत राहाणार आहेत. आयुक्त कुणाल कुमार यांच्या एका सहकारी अधिकार्‍याच्या वर्तणुकीबद्दल नगरसेवकात कमालीची नाराजी आहे. त्याबद्दल सभागृह नेता या नात्याने भिमाले यांच्याकडे नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. भिमाले यांच्या भाषणाला नगरसेवकांनी दाद दिली त्यामागे हेही एक कारण आहे.

भाजपच्या अपयशाचे खापर आयुक्तांवर?
पालिकेत भाजपची सत्ता येऊन अवघे सहा महिने झाले आणि आयुक्त हटाव अशी भाषा भाजप करू लागला आहे. सहा महिन्यातील भाजपच्या अपयशाचा पंचनामा राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच मांडला. त्या कथित अपयशाचे खापर आयुक्तांवर फोडायचे असा काही प्रकार आहे का?,असे बोलले जाते. महापौर बंगल्यावर भाजप नगरसेवक यांच्या कार्यशाळा पक्षामार्फत घेतल्या जातात. त्यात महापालिकेची व्युहरचना ठरते. भिमाले यांचे इशारे त्याचा भाग आहेत का? असेही प्रश्‍न पक्षातच निर्माण झाले आहेत.

भाजपला आयुक्त झाले नकोसे
मेट्रो, स्मार्ट सिटी योजना, शेअर बाजारात नोंदणी, समान पाणी पुरवठा याकरीता आयुक्तांनी कमालीचे परिश्रम घेऊन आराखडे तयार केले. हे सर्वांना मान्य आहे. किंबहुना त्यांच्या या कामगिरीमुळे भाजपचा शिक्का कुणाल कुमार यांच्यावर विरोधकांनी मारला. अचानक तेच आयुक्त भाजपला नकोसे झाले याचे आश्‍चर्य आहे. दरम्यान कुमार यांच्या बदलीची चर्चा चालू असतानाच एकदम भाटीया करू, असे का धमकावले.

भाटीया करू म्हणजे काय?
अरुण भाटीया महापालिकेचे आयुक्त होते. धडाकेबाज कारवाईने ते पुणेकरांमध्ये लोकप्रिय होते. बड्या लोकांची बेकायदा बांधकामे भाटीया यांनी जमीनदोस्त केली होती.24 अधिकार्‍यांना त्यांनी निलंबित करण्याची धमक दाखविली होती. त्यांना हटविण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यात भाजपही होता. मुख्यसभेत सर्व पक्षांनी मिळून अविश्‍वास ठराव मांडला तो मंजूर केला. त्यानंतर काही तासात राज्य सरकारने भाटीया यांची बदली केली. तशी कारवाई करण्याचा भाजपचा विचार आहे का? आणि असेल तर शिवसेना त्यांना पाठिंबा देणार का? नवी मुंबई महापालिकेत तुकाराम मुंडे यांना सर्व पक्षीय त्रास अनुभवायला मिळाला आहे. भिमाले यांनी भाटीया यांचे जुने उदाहरण देण्यापेक्षा मुंडे यांचे ताजे उदाहरण दिले असते तर त्याला ताजेपणा आला असता.