पालिका आरोग्यप्रमुख पदासाठी चालढकल

0

पुणे । गेले तीन महिने रिक्त असलेले महापालिकेचे आरोग्य प्रमुखपद भरण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील तब्बल 25 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी (दि.18) रोजी होणार होत्या, मात्र त्यापुढे ढकलून बुधवारी घेतल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आधीच आरोग्यप्रमुख नेमणुकीसाठी उशीर झाला असताना मुलाखतीसाठी देखील तारीख पे तारीख चालल्याने आरोग्यप्रमुख कधी मिळणार याबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेत 2011पासून आरोग्यप्रमुख हे पद रिक्त आहे. डॉ. आर.आर परदेशी यांचा सेवा काल संपल्यानंतर तत्कालीन उपआरोग्यप्रमुख डॉ. एस.टी परदेशी यांच्याकडे या पदाचे प्रभारी कामकाज देण्यात आले होते. त्यानंतर 31 मे 2017 रोजी डॉ. परदेशी सेवा निवृत्त झाल्यानंतर या पदावर अद्याप कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. डॉ. परदेशी यांच्या निवृत्तीच्या आधी महापालिकेकडून या पदावर राज्यशासनाचा अधिकारी पाठविण्याची मागणी करण्यात आली होती.

आरोग्यप्रमुखपदासाठी 25 अर्ज
मात्र शासनाकडून महापालिकेत येण्यास कोणाही अधिकारी तयार नसल्याने पालिकेकडून या पदासाठी थेट आरोग्यप्रमुख भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने आरोग्यप्रमुखपदासह इतर 8 तज्ज्ञांच्या जागांसाठी अर्ज मागविले होते. त्यात आरोग्यप्रमुखपदासाठी सुमारे 25 अर्ज आले असून इतर पदांसाठी 65 अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुसार, उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यातील पात्र उमेदवारांची शनिवारी मुलाखत घेण्यात येणार होत्या त्या आता बुधवारी होणार आहेत.