पुणे । सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर जास्तीतजास्त व्हावा, तसेच त्या ठिकाणी नागरिकांना अत्याधुनिक आणि पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवरील स्वच्छतागृहांप्रमाणे सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहारात 30 ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.
स्वच्छतागृहे उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील काही महिन्यांत ही स्वच्छतागृहे पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहेत. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे, स्वयंचलित पाणी यंत्रणा, दर्शनिय भागावर व्यावसायिक जाहिरातींसाठी जागा यासह अनेक अत्याधुनिक सुविधा या स्वच्छतागृहांमध्ये उपलब्ध करणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात
या स्वच्छतागृहांचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून स्मार्ट सिटीसाठी निवडलेल्या बाणेर-बालेवाडी भागात अशा प्रकारचे एक स्वच्छतागृह उभारले आहे. त्याच धर्तीवर हे स्वच्छतागृह असणार असून जुन्या प्रकराच्या स्वच्छतागृहाची संकल्पना मोडीत काढणारे हे अत्याधुनिक स्वच्छतागृह असणार असल्याचा दावा जगताप यांनी केला आहे. या स्वच्छतागृहांची उंची तसेच रचना ही खेळती हवा जास्तीत जास्त असेल, अशा प्रकारे केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या असणार सुविधा
अपंग व्यक्तीकरता स्वतंत्र सीट, वॉटरलेस युरिनल्स व स्वयंचलित पाणी यंत्रणा, 24 तास वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा यंत्रणा तसेच जनरेटर, आरसे, वॉशबेसीन, केअरटेकरसाठी निवासी जागा, पाश्चिमात्य पध्दतीची सीट, महिलांसाठी फिडींग रूम, नागरिकांसाठी फिडबॅक यंत्रणा, डोनेशन बॉक्स.