दैनंदिन वापरासाठी 90 मेगावॅटच्या विजेची गरज; 20 हेक्टर जागेची मागणी
पुणे : महापालिकेसाठी लागणारी विजेची गरज 100 टक्के सौरऊर्जेतून पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून स्वतःचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिकेचा दैनंदिन विजेचा भार 90 मेगावॅट असून ही विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार असून या प्रकल्पासाठी 20 हेक्टर जागेची मागणी महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
जिल्हा प्रशासनाने जागा द्यावी
मागील आठवड्यात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांची बैठक घेतली होती. या बैठकीत महापालिकेने सौरऊर्जा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सवलत तसेच अनुदान मिळण्याबाबत विनंती केली. यावेळी महापालिकेने स्वतःचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान महापालिकेस उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. तसेच या प्रकल्पासाठी शहरात एकाच ठिकाणी सुमारे 20 हेक्टर जागा उपलब्ध नसल्याने पालिकेस ही जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास पाठविला आहे.
प्रस्ताव ‘मेडा’कडे पाठविला
शहरातील पदपथ, महापालिकेची कार्यालये, तसेच प्रकल्पांसाठी महापालिकेस दरवर्षी वीज लागते. ही वीज महापालिका महावितरणकडून खरेदी करते. त्यासाठी पालिकेस दरवर्षी 60 कोटी रुपये खर्च करावा लागतो. तसेच वाढत्या विजेच्या दरामुळे हा खर्च वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून ‘सौरसिटी’चा प्रस्ताव ‘मेडा’कडे पाठविला होता. मात्र, नंतर तो बारगळला.