पालिका करणार अनधिकृत होर्डिंगचे जीपीएस मॅपिंग

0

पुणे । शहरातील अनधिकृत होर्डिंगला चाप बसावा यासाठी होर्डिंग असलेल्या ठिकाणची जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करणे अधिक सोपे जाणार असल्याचे आकाशचिन्ह परवाना विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी सांगितले.शहरामध्ये अनधिकृत होर्डिंगची संख्या मोठी आहे. महापालिका प्रशासनाला कारवाई करताना अनेक अडचणी येत आहेत. यामध्ये होर्डिंग नक्की कोणाच्या मालकीचे आहे. जागा मालक कोण? कोणाला नोटीस द्यायची आदी प्रश्‍न निर्माण होतात. त्यामुळे अशा होर्डिंगवर कारवाई करताना अडचणी निर्माण होतात. महापालिकेचे अधिकृत 1 हजार 700 होर्डिंग आहेत. येत्या दोन महिन्यामध्ये प्रत्येक होर्डिंगचे स्थान निश्‍चित करून जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. यामुळे याठिकाणी असलेल्या होर्डिंगचा प्रकार, त्याचे ठिकाण आणि आकाराची माहिती कळू शकणार आहे. पालिका प्रशासनाने यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे.

मॅपिंगनंतर होर्डिंगचे नूतनीकरण
शहराच्या विविध भागामध्ये ही होर्डिंग असल्यामुळे याचा जीपीएस मॅपिंग करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. मात्र, एकदा मॅपिंग झाल्यानंतर पालिका प्रशासनाला होर्डिंगचे नूतनीकरण करणे सोपे जाणार आहे. महापालिका प्रशासन अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाईचा बडगा उगारत असते. मात्र नक्की कोणाच्या मालकीचे होर्डिंग आहे, कोणाला नोटीस द्यायची अशा विविध अडचणी पालिका प्रशासनासमोर उभ्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 91 ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभारण्यात येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.