पुणे । महापालिकेच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये सुरू असलेल्या कामकाजाची तपासणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन आणि मुख्यलेखा व वित्त विभागाच्या कर्मचार्यांचे हे पथक असणार असून डिसेंबर 2017 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत सुमारे 46 विभागांच्या कामकाजाची तपासणी केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नुकतेच याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसर, पुढील वर्षापासून संबधीत विभागाच्या कामकाजाचे मूल्यमापन केले जाणार आहे. महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात प्रशासकीय कामकाजासह नागरिकांंच्या वेगवेगळ्या कामांचा समावेश असतो. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सेवा हक्क कायद्यानुसार, या कामांसाठी मुदती निश्चित करून दिल्या आहेत. तसेच प्रशासकीय कामकाजाच्या सुधारणांसाठीही कार्यपध्दतीत बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार, प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. मात्र, ते योग्य पध्दतीने होते, की नाही याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे यापुढे विभागांच्या कामात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र तपासणी पथके नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
21 प्रकारच्या कामकाजाची होणातपासणी
या पथकाकडून सुमारे 21 पद्धतीच्या कामकाजाची तपासणी केली जाणार आहे. त्यात सामन्य प्रशासन विभागाकडून शासन संदर्भ, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांचे अर्ज, समित्यांच्या ठरावावरील अभिप्राय, झेड प्लस संदर्भ, माहिती अधिकार अर्ज व सुनावण्या, लोकशाही दिन तक्रारी, प्रलंबित न्यायालयीन दावे, तारांकीत प्रश्न, प्रलंबित प्रकरणांचा तपशील याची तपासणी केली जाणार असून, वित्त विभागाकडून लेखा परीक्षण मुद्यांची पूर्तता, वित्त विषयक बाबींची पूर्तता, विभागाकडून करण्यात येणारे खर्च याची तपासणी केली जाणार आहे.
पाच कर्मचार्यांचे पथक
सामान्य प्रशासन विभाग आणि मुख्यलेखा व वित्त विभागाच्या प्रत्येकी पाच कर्मचार्यांचे हे पथक असणार आहे. या पथकांनी दहा दिवस आधी विभाग प्रमुखास सूचना द्यायची आहे. तपासणी झाल्यानंतर पुढील आठ दिवसात पथकाने अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर केल्यानंतर संबधित विभागांना कामकाजाच्या पध्दतीत सुधारणा करण्यासाठी नियम घालून दिले जाणार आहेत.