कल्याण । येथील पूर्वेकडील गणेशवाडी प्रभागातील गणपती मंदिर ते दादासाहेब गायकवाड मैदानापर्यंत जाणार्या रस्त्यावर पालिका प्रशासनाने डांबरीकरण केले. यामुळे दरवर्षी खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करणार्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा रस्ता तयार करताना पालिका प्रशासनाच्या कर्मचार्यांना रसत्याखालून जाणार्या सांडपाणी वाहिन्यांचा विसर पडला.
भविष्यात गटार तुंबल्यास त्याची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असणारे मॅनहोल न ठेवताच हा रस्ता बनवण्यात आला आहे. मागील चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील गटार तुंबले. यामुळे सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारी हे तुंबलेले गटार साफ करण्यासाठी आले होते.