पुणे । महापालिकेच्या कामगारांविषयी काँग्रेस पक्ष सकारात्मक भूमिका घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी राष्ट्रीय मजदूर संघाशी संलग्न महापालिका कामगार संघटनेच्या मेळाव्यात दिली. महापालिका कामगार संघटनेचा 28 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गंजपेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कामगारांचा खास मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बागवे, अभय छाजेड, सुनील शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, निमंत्रक एस.के. पळसे आदी उपस्थित होते. या मेळाव्यास एक ते दीड हजार कामगार उपस्थित होते. या मेळाव्यात उल्लेखनीय कार्य करणार्या कामगारांचा पुष्पगुच्छ देऊन खास सन्मान करण्यात आला.
शिंदे म्हणाले, महापालिकेच्या कामगारांचे अनेक प्रश्न व समस्या महापालिकेच्या प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. आरोग्य खाते, पाणीपुरवठा, कंत्राटी सुरक्षा कामगार व अन्य खात्यांच्या कामगारांचे घाणभत्ता व विविध मागण्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी संघटनेकडून पाठपुरावा केला जात आहे. या पाठपुराव्यास काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन सहकार्य करण्याची गरज आहे. छाजेड म्हणाले, कामगारांना सुरक्षा मिळणे महत्त्वाचे आहे. त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. आत्ता परिस्थिती बदलली आहे. कामगारांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. कामगारांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेस पक्ष झटेल. सीताराम चव्हाण यांनी कामगारांना घाणभत्ता मिळत नसल्याचे आपल्या भाषणात सांगितले. याप्रसंगी सरचिटणीस एस.के. पळसे यांनी प्रास्ताविक केले. अशोक पळसुले यांनी आभार मानले.