भुसावळ पालिकेच्या सभेत 17 मिनिटात 31 विषयांना मंजुरी ; अनधिकृत नळ कनेक्शन होणार अधिकृत
भुसावळ- शहरावर पाणीटंचाईचे कोसळलेले संकट पाहता पालिकेकडून लवकरच 10 नवीन टँकरची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी देत नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. गुरूवारी पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. 17 मिनिटात 31 विषयांना मंजुरी देण्यात आली असून या माध्यमातून शहरात विविध प्रकारची विकासकामे होणार आहे. शहरातील जिवंत विहिरींच्या स्वच्छतेसह शहरातील विविध भागातील लिकेजस दुरुस्त करणे, पेव्हरब्लॉक, गटारींच्या कामांसह शहरातील मच्छी मार्केट भागात 30 सीटच्या शौचालय उभारणीस मंजुरी देण्यात आली.
विरोधाविनाच पार पडली सभा
गोपाळ नगरातील पालिकेच्या सभागृहात गुरूवारी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष भोळे हे पीठासीन अधिकारी होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे सत्ताधारी गटनेते मुन्ना तेली व विरोधी पक्ष असलेल्या जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारेदेखील अपात्र ठरल्याने सभेला गैरहजर होते. सुरुवातीला कामगार नेते जार्ज फर्नाडीस यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. एरव्ही गोंधळ, गोंगाटात पार पडणार्या सभेत जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी संयमी भूमिका घेतल्याने सर्वच विषयांना मंजूरी देण्यात आली.
अवैध नळ कनेक्शन होणार नियमित
नगरसेवक युवराज लोणारी यांनी पालिका 10 टँकर खरेदी करीत असलीतरी या टँकरसाठी ट्रॅक्टर असणे आवश्यक असून पालिकेने ते खरेदी करावे वा भाडे तत्वावर लावावे, असा मुद्दा मांडत शहरातील अवैध नळ कनेक्शनला वैध करण्याची मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. नगराध्यक्षांनी याबाबत सकारात्मक दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शहरातील अनेक भागात चार दिवस तर काही भागात दोन दिवसाआड पाणी येते त्यामुळे सर्वच भागात समान पद्धत्तीने पाण्याचे वाटप केले जावे, असा मुद्दा त्यांनी मांडल्यानंतर त्याबाबत दखल घेण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले
या विषयांना सभागृहात मिळाली मंजुरी
पाणीपुरवठा विभागासाठी लिक्वीड क्लोरीन गॅस सिलेंडर व ब्लिचिंग पावडर खरेदी करणे, अॅलम व पॉली अॅल्युमिनीयम क्लोराईड, इलेक्ट्रोफ्लोक्युलंट पावडरची खरेदी करणे, इलेक्ट्रीक मोटर रीवाईंडींग, पाईप लाईनचे लिकेज व दुरस्ती करणे, प्रभाग पाच मध्ये दामु कुंभार वाड्याजवळ पुल बांधणे, राहुल नगरात काँक्रिटीकरण करणे, विविध प्रभागात गटारी, पेव्हर ब्लॉक बसविणे, अंगणवाडी साहित्य खरेदी करणे, महिला मेळावा आयोजन करणे, तापी नदीतील बंधार्याचा पाणीसाठा वाढविण्यासाठी लिकेज कमी बंद करणे, जिवंत पाण्याच्या विहिरींची सफाई करणे, टेक्नीकल हायस्कूल, जामनेर रोडवरील अग्रसेन चौक परीसर, डेली बाजार, बस स्टॉपजवळ महिला व पुरूषांसाठी स्वच्छतागृह उभारणे, मच्छी मार्केट भागात 30 सीटचे शौचालय बांधणे, प्रभाग 22 मध्ये आनंद एज्युकेशन सोसायटीजवळील जीर्ण पुल नवीन बांधणे आदी 31 विषयांना मंजुरी देण्यात आली.