पालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती; आज फैसला!

0

राहुल जाधव, विलास मडिगेरी की शीतल शिंदे?

पिंपरी-चिंचवड : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत, याचा फैसला शनिवारी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार असून, अध्यक्षपदाची प्रत्यक्ष निवडणूक बुधवारी (दि.7) दुपारी बारा वाजता होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत आहे. दरम्यान, नगरसेवक राहुल जाधव, विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या जुन्या गटाकडून नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर, आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाचे खरे दावेदार राहुल जाधव हेच आहेत, अशी भूमिका त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी घेतली आहे.

जुन्यांना मिळाली महत्वाची पदे!
आमदार महेश लांडगे गटाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचे खरे दावेदार समाविष्ट गावातील भाजपचे नगरसेवक राहुल जाधव हेच आहेत. ग्रामीण भागातील पक्षाचा चेहरा म्हणून ते ओळखले जातात. तसेच भोसरी मतदारसंघात माळी समाजाचे मोठे प्राबल्य असून, जाधव हे माळी समाजाचे आहेत. आगामी निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. जाधव यांनी आमदार महेश लांडगे यांना खंबीर साथ दिली आहे. त्यामुळे खर्‍याअर्थाने जाधव हेच स्थायी समिती अध्यक्षपदाचे दावेदार आहेत. पक्ष त्यांचा विचार करेल, अशी अपेक्षा नगरसेवक व्यक्त करत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे जुने केवळ सात नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी पहिल्याच वर्षात पाच जणांना पालिकेतील पदे देण्यात आली आहेत. एकनाथ पवार यांच्याकडे सभागृह नेतेपद तर शैलजा मोरे यांच्याकडे उपमहापौरपदाची धुरा आहे. केशव घोळवे प्रभाग अध्यक्ष असून, प्रा. उत्तम केंदळे स्थायीचे सदस्य आहेत. शारदा सोनवणे या विधी समितीच्या सभापती आहेत. माऊली थोरात आणि मोरेश्‍वर शेडगे यांनी स्वीकृत नगरसेवकपद दिले गेले आहे. त्यामुळे जुन्यांना पालिकेतील महत्वाची पदे दिली गेली आहेत.

राहुल जाधव हेच प्रबळ दावेदार!
आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये ठरल्याप्रमाणे महापौर सव्वा वर्षानंतर बदलला जाणार आहे. विद्यमान महापौरांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आगामी महापौर चिंचवड विधानसभा मतदार संघातील होईल. तर, स्थायी समितीचे अध्यक्षपद भोसरीला देण्यात येईल, असा राजकीय फॉर्म्युला निश्‍चित झाला आहे. महापौर नितीन काळजे आणि नगरसेवक राहुल जाधव हे पहिल्यापासून आमदार महेश लांडगे यांच्यासोबत आहेत. त्यांनी दादांच्या सांगण्यानुसार भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे दादांसोबत आलेल्या नगरसेवकांना पालिकेतील पदे देणे गरजेचे आहे. तसेच जुन्या सर्वांना पदे दिली गेली आहेत. त्यामुळे आगामी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल जाधव यांच्या नावाचा पक्ष विचार करेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

राज्याच्या नेतृत्वाकडून मडिगेरींना हिरवा कंदील
स्थायी समितीत दहा भाजप, चार राष्ट्रवादी काँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. अध्यक्षपदासाठी राहुल जाधव, विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. मडिगेरी यांच्या नावाला राज्य नेतृत्वाचा ’हिरवा’ कंदील आहे. परंतु, शहराचे दुसरे कारभारी असलेले आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्या नावाचा तीव्र आग्रह पक्षाकडे धरला आहे. तर, लक्ष्मण जगताप यांनी शीतल शिंदे यांची शिफारस केली असल्याची, चर्चा आहे. त्यामुळे पक्ष नेमके या तिघांपैकी स्थायीचे अध्यक्षपद कोणाला देते याकडे राजकीय वर्तुळासह शहराचे लक्ष लागले आहे.

आज नामनिर्देशन पत्रे स्वीकारणार
पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.