पालिका दवाखान्यात रुग्णांऐवजी वैद्यकीय अधिकार्‍यांना कुलरची हवा

0

उष्माघात कक्ष ठरला नावालाच ; अधिकार्‍यांच्या संवेदना बोथट झाल्याची टिका

भुसावळ- शहराचे उन्हाळ्यात तापमान 45 ते 47 अंशावर नेहमीच पोहोचत असल्याने पालिकेच्या दवाखान्यात उष्माघात कक्षातील रुग्णांसाठी सामाजिक बांधीलकी जोपासत सामाजिक विचार मंचने कुलर दिला होता मात्र या कुलरचा रुग्णांऐवजी वैद्यकीय अधिकारीच वापर करीत असल्याची बाब बुधवारी उघड झाल्याने शहरातील नागरीकांमधून पालिका दवाखान्यातील अधिकार्‍यांवर टिकेची झोड उठत आहे.

पाहणीत बाब झाली उघड
भुसावळ सामाजिक विचार मंचच्या वतीने भुसावळ नगरपालिका दवाखान्यातील उष्माघात कक्षास गतवर्षी 2 एप्रिल 2017 रोजी कुलर भेट देण्यात आला होता. भुसावळसारख्या शहरात 45 ते 47 अंश डिग्री असलेले तापमन व त्यात उष्माघाताने बळी पडणार्‍या रुग्णांची संख्या पाहता रुग्णांना आराम पडण्यासाठी कुलर भेट देण्यात आला. सामाजिक विचार मंचचे प्रतिनिधी संदीप पाटील हे बुधवारी पालिका रुग्णालयात गेले असता उष्माघात कक्षात रुग्ण कुलरविनाच उपचार घेत होते तर दिलेला कुलर हा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दालनात लावल्याचे आढळले. याबाबत विचारणा केल्यानंतर उडवा-उडवीचे उत्तरे पाटील यांना देण्यात आली. असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी आता याबाबत दखल घेऊन काही कारवाई करतील का? की सर्वांच्याच सामाजिक संवेदना बोथट झाल्या आहेत? असा प्रश्न आता सुज्ञ शहरवासी उपस्थित करीत आहेत.