पालिका निवडणुकीत काँग्रेसतर्फे कव्वाली, एलइडी व्हॅनचा वापर

0

नंदुरबार । नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून कॉर्नर सभा,प्रचार रॅलीने शहर दुमदुमून निघाले आहे. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात हाऊस टू हाऊस प्रचार सुरू केला आहे.1 डिसेंबरपासून प्रचाराचा धुराळा उडवत काँग्रेस उमेदवारांसाठी कव्वाली,एलइडी व्हॅन आदी माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जाते आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिलांसह,तरुण,लहान मुले वयोवृद्ध सारेच सरसावले आहेत. नगरपालिकेच्यावतीने नंदुरबार शहरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आरसा मतदारांसमोर ठेवत मत मागण्यात येत आहे.

ठिकठिकाणी कॉनर्र सभा
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांच्यासह प्रत्येक प्रभागातील नगरसेवक आपल्या समर्थकांसह प्रचारासाठी फिरत आहेत. रिक्षांवर लावण्यात आलेले स्पीकर,एलएडीच्या माध्यमातून दाखविण्यात येणारी विकास कामांची डॉक्युमेंटरी,आदी माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. ठिक ठिकाणी होणार्‍या कॉर्नर सभांमधून आ. चंद्रकांत रघुवंशी मतदारांच्या समोर जात आहेत. एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून रोज होणार्‍या राजकिय हालचालींचा पक्षाचे नेते समाचार घेऊ लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना यांची युती आहे. 5 जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे करण्यात आले असून त्या त्या प्रभागातील काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार एकत्रित प्रचार करतांना दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे आव्हान असले तरी त्याचा सामना करण्यासाठी आ. चंद्रकांत रघुवंशी यांची काँग्रेस सेना सज्ज झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. 13 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने निवडणुकीतील मतदारांचे काऊंन डाऊन सुरू झाले आहे. आता नंदुरबारकरांना प्रतीक्षा आहे ती जाहिर सभांची या सभेत कोण काय बोलतो,याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.