मुंबई । मुंबई महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांनंतर आता प्रभाग समित्यांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिकेतील 17 प्रभाग समित्यांच्या निवडणुका येत्या 12 व 13 एप्रिलला होणार आहेत. सोमवारी या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. वैधानिक समित्यांप्रमाणे या निवडणुकाही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचा कारभार सभागृह, वैधानिक व विशेष समित्यांच्या माध्यमातून तर स्थानिक पातळीवर कारभार प्रभाग समित्यांच्या माध्यमातून चालवण्यात येतो. महापालिकेची 24 प्रभाग कार्यालये असून 17 प्रभाग समित्यांच्या माध्यमातून या कार्यालयांचा कारभार चालवला जातो. या प्रभाग समित्यांवर ज्या राजकीय पक्षाचे नगरसेवक जास्त त्या पक्षाचा अध्यक्ष निवडला जातो.
भाजपकडे 8 तर सेनेकडे 7 प्रभाग
सध्या 17 पैकी 8 प्रभाग समित्या भाजपाकडे, एक प्रभाग समिती भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय सेनेकडे तर शिवसेनेकडे 6 प्रभाग समित्या असून एक प्रभाग समिती शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेकडे होती. सहा महिन्यांपूर्वी मुंबई मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होणार आहे. मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांची कुर्ल्याच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून सुधार समितीच्या अध्यक्ष पदावर विराजमानही झाले आहेत. त्यामुळे एल विभागाची प्रभाग समिती शिवसेनेकडे राहणार आहे. तर मनसेतून घाटकोपर येथील दोन नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्याने एन विभागाची प्रभाग समितीही शिवसेनेकडेच राहण्याची शक्यता आहे.
निवडणुकीची तारीख
12 एप्रिल रोजी ए, बी आणि ई, सी आणि डी, एफ उत्तर आणि एफ दक्षिण, जी दक्षिण, आर मध्य आणि आर उत्तर, आर दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिण, 13 एप्रिल रोजी जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, एम पश्चिम, एल, एन, एस आणि टी आणि 19 एप्रिल रोजी एम (पूर्व)