पुणे । पुणे महानरगरपालिका प्रशासनातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘मॉडेल रोड’ म्हणून जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचना करण्यात आली. आता महापालिका भवन ते बालगंधर्व दरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पालिकेसमोरील सर्व बस थांब्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे श्रमिक भवनजवळ पालिकेसमोरील बस थांबे हलविण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी या परिसराला विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. याअंतर्गत औंध परिसरात मॉडेल रोड ही संकल्पना राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मात्र, या संकल्पनेस स्थानिक नागरिक व व्यापार्यांकडून सुरुवातीला विरोध झाला. परंतु, ब्रेमेन चौकातील रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
गरवारे पुलापर्यंत रस्त्याची पुनर्रचना
अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, स्ट्रीट वॉक, फ्लॉवर बेड, बसण्यासाठी प्रशस्त बाक बसविण्यात आले आहेत. रस्त्यावरील बस थांबेही आकर्षक करण्यात आले आहेत. पालिका प्रशासनातर्फे मॉडर्न कॅफे चौक ते डेक्कन चौकापर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जात असून टप्प्याटप्प्याने गरवारे पुलापर्यंत रस्त्याची पुनर्रचना केली जाणार आहे.
अतिक्रमण हटवणार
पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्याच्या बस थांब्याजवळ पालिकेचे प्रवेशद्वार असणार आहे. त्यामुळे या परिसरातील 13 बस थांबे श्रमिक भवनजवळ स्थालांतरित केली जाणार आहेत. मॉडेल रोड म्हणून मनपा भवन ते जंगली महाराज रस्ता अर्थात बालगंधर्वपर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येईल. परिणामी काँग्रेस भवनच्या बाजूचे व काँग्रेस भवनच्या समोरील सर्व अतिक्रमण हटवले जाणार आहे.