मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस 1 ऑगस्ट 2017 रोजी 125 वर्ष पूर्ण होत असल्याने महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीस विविध रंगांची विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुख्यालयाच्या जुन्या व विस्तारित इमारतीच्या बाह्यदर्शनी भागावर वेगवेगळ्या रंगछटेच्या प्रकाश योजना प्रदान करून या जुन्या जागतिक वास्तुशिल्पास प्रकाशमय प्रतिमा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा देखील प्रकाशमान करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत 1893 साली बांधण्यात आली होती. येत्या 1 ऑगस्टला या इमारतीस 125 वर्ष होत असून पालिकेच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने पालिकेच्या मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींना विशेष रोषणाई केली जात आहे. या रोषणाईत विद्युत दिव्यांचा चक्रीय पद्धतीने रंग बदलण्याचे प्रयोजन असून त्यांचे नियंत्रण सॉफ्टवेयर प्रोग्रामिंगच्या माध्यमातून केले जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम आवश्यकतेनुसार बदल्याची व्यवस्था असलेल्या नियंत्रण कशाची देखील उभारणी करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी मुख्यत्वे करून प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिन आणि महाराष्ट्र दिनी तिरंगी ध्वजाच्या दिनी रंगानुरूप रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच सोमवार ते रविवार या दिवशी विविध रंगछटांमधील विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.