भुसावळ। पालिका रुग्णालयात रुग्णांची होत असलेली गैरसोय व कर्मचार्यांचा बेजबाबदारपणा आणि रुग्नालयातील गंभीर प्रकारच्या घटना घडत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासाठी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेतली.
महत्वाच्या अधिकार्यांची रिक्त पदे, लसींचा अभाव, इमारतीची झालेली दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि परिसरात साचणार्या घाणीमुळे रुग्णांची प्रचंड परवड होत असल्याचे दिसून येत आहे. शवविच्छेदनासाठी भुसावळ सोडून इतर शहरांमध्ये भटकंती करावी लागत आहे. ही फार मोठी लाजिरवाणी बाब आहे असे मत मंडळाच्या सदस्यांनी मांडले.
निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू
वरणगाव येथील रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यु झाला. लस नसल्याची ओरड नेहमीच होत असते. दुसरीकडे रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेने कुठलीच व्यवस्था केलेली नाही. यावरुन आरोग्य यंत्रणा किती बेसावध आहे, हे दिसून येत आहे. यासर्व बाबतीत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. उपाययोजना त्वरित कराव्या अन्यथा भुसावळ व वरणगाव येथे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी दिला. याप्रसंगी तालुका प्रमुख समाधान महाजन, विलास मूळे, प्रा.धिरज पाटील, शिक्षक सेनेचे विनोद गायकवाड, वाहतुक सेनेचे रफीक खान, अजय पाटील, हेमंत चौधरी उपस्थित होते.