पुणे । पुणे महापालिका प्रशासनाने नुकत्याच घेतलेल्या खात्यांतर्गत परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत अनेक चुका आढळून आल्या आहेत. या उत्तरपत्रिकेत महापौरांचा कालावधी अडीच वर्षे नसून चक्क पाच वर्षे असल्याचे सांगितले आहे, तर महाराष्ट्र महापालिका अधिनियमही केव्हा अंमलात आला याचेही उत्तर चुकीचे दिले आहे. महापालिकेच्या विभाग प्रमुखांनीच ही उत्तरपत्रिका तयार केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पदोन्नतीसाठी महापालिकेच्या विविध खात्यांमधील 855 कनिष्ठ लेखनिकांची नुकतीच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते. महापालिकेच्या कामकाजासंदर्भातील प्रश्नांचाच त्यामध्ये समावेश होता. परीक्षा झाल्यावर प्रशासनाकडून आदर्श उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. मात्र, त्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम 2000 नुसार महापौर व उपमहापौर यांचा कालावधी किती असतो या प्रश्नाचे उत्तर 5 वर्षे असे उत्तरपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, महापौरपदासाठीचे आरक्षण दर अडीच वर्षांनी बदलत असल्याने हा कालावधी पाच वर्षांचा नसून अडीच वर्षांचा असतो हे योग्य उत्तर आहे, तर महाराष्ट्र महापालिका अधिनियम केव्हा अंमलात आला या प्रश्नाचे उत्तर 1949 असे देण्यात आले आहे. वास्तविक बरोबर उत्तर हे 1965 आहे. अशा साध्या चुकांचा फटका बरोबर उत्तरे लिहिलेल्या कर्मचार्यांना बसण्याची शक्यता आहे.