पालिका शाळांच्या मुलांच्या पायात दिसणार स्पोर्ट्स शूज

0

मुंबई । पालिका शाळांतील मुलांना गणवेशासह 27 शालेय वस्तू दिल्या जात असताना आता या मुलांना क्रीडा गणवेशही दिला जाणार आहे. गणवेशाबरोबरच यासर्व मुलांना कॅनव्हॉसचे शूजही दिलं जाणार आहे. त्यामुळे खासगी शाळांप्रमाणे महापालिका शाळांमधील मुलंही एक दिवस विविध रंगाच्या क्रीडा गणवेशासह बूट घालून खेळताना दिसतील. मात्र, या बूट पुरवठा करणार्‍यांच्या कंत्राटात बाटा कंपनी बाद झाली आहे. त्यांनी सादर केलेले बुटाचे सॅम्पलच बाद ठरले आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना महापालिकेत स्थान नसल्याचे स्पष्ट होत आहे. गणवेशासह आणखी काय? मुंबई महापालिका शाळांमधील मुलांच्या गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी 27 शालेय वस्तुंचे वाटप केले जाते. या शालेय वस्तूंसोबत मध्यान्ह आहारही दिला जात आहे. पोषण आहार म्हणून सुगंधित दूध किंवा चणे, शेंगदाणे सारखा सुकामेवा देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

मात्र आता याचधर्तीवर शारीरिक शिक्षणाच्या आठवड्याच्या एक दिवसाकरता मुलांना गणवेश आणि कॅनव्हॉस शूज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. शालेय मुलांना शारीरिक शिक्षणाच्या तासात खेळाकरता सव्वा तीन लाख मुलांसाठी शूजची खरेदी केली जात आहे. यासाठी 232 रुपयांमध्ये कॅनव्हॉसच्या शूजची खरेदी केली जात असून यासाठी साडे सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी नामांकित कंपन्या तथा उत्पादन कंपन्या येत नसल्याचे बोलले जातं. यापूर्वी 27 शालेय वस्तुंच्या पुरवठा करण्याचे कंत्राट शुगर कंपनीने घेतला होता. परंतु, यावेळी मागवलेल्या निविदांमध्ये खुद्द बाटासारख्या नामांकित कंपनीने भाग घेतला. पण या कंपनीने सादर केलेले बुटाचे सॅम्पल महापालिकेच्या प्रयोगशाळेतील चाचणीत बाद ठरले. त्यामुळे अन्य पुरवठादार कंपनी असलेल्या कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या.